गाड्या २ ते ३ तास उशिरा, सुविधांची वानवा
मडगाव : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी यावर्षी जादा गाड्यांच्या फेर्या असल्या तरी दोन ते तीन तास उशिरा येणार्या गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गाड्यांतील व स्थानकांवरील गर्दी, पावसाचा मारा व स्थानकावरील सुविधांची कमी या कालावधीत दिसून आली.
कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, याच जादा गाड्यांच्या वाढलेल्या फेर्यांमुळे नियमित येणार्या गाड्यांसह विशेष गाड्यांचे वेळापत्रक बिघडून गेलेले आहे. रेल्वेस्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना गाडीला दीड ते दोन तास विलंब होत असल्याची सूचना मिळते. यामुळे स्थानकांवरच थांबावे लागते. त्यात ठराविक प्रवाशांसाठीच बैठकीची व्यवस्था असल्याने इतरांना मिळेल त्या ठिकाणी बैठक मारत गाड्यांची वाट पहावी लागते. दोन ते तीन गाड्यांचे प्रवासी एकाचवेळी स्थानकावर असतात. पावसाचा मारा सतत सुरू असून भिजून आलेल्या प्रवाशांना स्थानकावरही व्यवस्थित उभे राहता येण्यासारखी जागा मिळत नाही. त्यातच रेल्वेस्थानकावरील स्वच्छतागृहांची संख्याही कमी असल्याने प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची वेळ आलेली आहे. मडगावसह कोकण रेल्वे मार्गावरील काही स्थानकांवर रेल्वे थांबत असलेल्या काही डब्यांपुरती शेड आहे. गाडीची सूचना आल्यावर भर पावसात डब्यात चढण्याच्या शर्यतीत प्रवाशांना भाग घ्यावा लागतो. विशेष गाड्यांतील गर्दीमुळे उभे राहण्यासाठी जागा शोधावी लागते. स्वच्छतागृहांची बिकट अवस्था व शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याआधीच संपणारे पाणी अशा संकटांचा सामना करत सध्या कोकण रेल्वेचे प्रवासी प्रवास करत आहेत.
बेघर, भिकार्यांच्या वास्तव्याने सुरक्षिततेचा प्रश्न !
मडगाव जंक्शनवर उतरल्यानंतर प्रवाशांना स्थानकाच्या फ्लायओव्हरवर बसलेल्या व अस्ताव्यस्त अवस्थेत रस्त्याच्या मधोमध झोपलेल्या बेघर व भिकार्यांचा सामना करावा लागतो. त्यातून वाट काढत जाणे प्रवाशांना असुरक्षित वाटते. रेल्वे पोलिसांकडून जंक्शन परिसर बेघर व भिकार्यांपासून मुक्त करण्याची मागणी होत आहे.
प्रवाशांची पायपीट
मडगाव रेल्वे स्थानकावर येणार्या काही एक्स्प्रेस गाड्या या १ ते ३ क्रमांकाच्या फलाटावर येतात. त्यात काही गाड्या त्यापुढील फलाटावर उभ्या करतात. यामुळे प्रवाशांना सुमारे दीड किलोमीटरचा फेरा मारुन फ्लायओव्हरवरुन मुख्य प्रवेशद्वारावर यावे लागते. त्यातच त्या फलाटावर बांधकाम सुरू असल्याने पावसातच वाट काढत जाण्याची कसरत करावी लागत आहे.