मडगावात स्वयंसेवी संस्थेच्या महिलांना शेडसाठी प्रयत्न!

मंत्री सुभाष फळदेसाई : वार्षिक माटोळी बाजाराचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September 2023, 11:52 pm
मडगावात स्वयंसेवी संस्थेच्या महिलांना शेडसाठी प्रयत्न!

मडगाव : राज्य सरकारकडून यावर्षी डिजिटल चतुर्थी बाजाराची संकल्पना राबवण्यात आली आहे. याअंतर्गत महिला बचतगट व स्वयंसेवी गटांनी दर्जावर लक्ष द्यावा. मडगावात स्वयंसेवी संस्थेच्या महिलांना कायमस्वरूपी शेड उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणार, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

मडगाव येथील लोहिया मैदानावर अटल ग्राम विकास एजन्सीतर्फे वार्षिक माटोळी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, दामू नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी गणेश चतुर्थीपर्यंतच्या काळात माटोळी सजवण्यासाठी वापरण्यात येणारी सर्व फळे, वन्य उत्पादने आणि फुले एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या वार्षिक माटोळी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. अटल ग्राम विकास संस्थेतर्फे हा बाजार दहा वर्षांपासून दरवर्षी आयोजित केला जातो. नेत्रावळी आणि सांगे तालुक्यातील काही भागातील शेतकरी आणि महिलांनी उपलब्ध करून दिलेल्या पारंपरिक आणि सेंद्रिय उत्पादनांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माटोळी बाजार दुर्गम खेड्यातील महिलांना कौशल्ये शिकण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. माटोळी बाजार ही संकल्पना आता राज्यभर रुजत आहे, असेही ते म्हणाले.

आमदार कामत यांनी स्थानिक विक्रेत्यांना त्यांच्या पारंपरिक उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देत अशा बाजाराचे आयोजन केल्याबद्दल अटल ग्राम विकास संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तुयेकर यांनी, माटोळी बाजार मडगाव आणि आसपासच्या लोकांना विविध प्रकारचे पारंपरिक आणि वन्य उत्पादन एकाच छताखाली उपलब्ध करून देतो. यातून लोकांचीही सोय होते व ग्रामीण भागाला उत्पन्नाचा स्त्रोत मिळत असल्याचे सांगितले. अटल ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सुभाष वेळीप यांनी प्रास्ताविक केले.