'ओव्हरटेक'चा आणखी एक बळी! पर्वरीतील भीषण अपघातात कार चालक जागीच ठार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th September 2023, 08:59 am
'ओव्हरटेक'चा आणखी एक बळी! पर्वरीतील भीषण अपघातात कार चालक जागीच ठार

पणजी : पंधरा दिवसांपूर्वी पर्वरीत कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पहाटे पुन्हा एक भीषण अपघात घडला. पर्यटक टॅक्सी आणि ट्रकच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. 


पर्वरीत रविवारी पहाटे पर्वरी पेट्रोल पंप समोर भीषण अपघात घडला. कंटेनरला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या कारची (जीए ०७ एफ ३९९०) पार्क केलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. यात कार चालक संतोष हरिजन (बेती, मूळ कर्नाटक) जागीच ठार झाला.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरू असलेले अपघातांचे सत्र अद्याप कायम आहे. महामार्गावर भरधाव वेगाने वाहने चालवताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून होणार्‍या अपघातांमध्ये वाढ होत आहे. काहीच दिवसांपूर्वी पर्वरीतच भरधाव वेगात असलेली नेक्सॉन कार झाडाला धडकून कारमधील तिघांचा मृत्यू झाला होता.

नेमके काय घडले?

कळंगुटमध्ये प्रवासी पर्यटकांना हॉटेलवर पोहोचवून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटक टॅक्सी कारचा पर्वरी येथे अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला वेगनआर कारने जोरदार धडक दिली. या अपघातात संतोष हनुमानाप्पा हरीजन (२९, रा. रामनगर बेती व मुळ बेळगाव) हा चालक जागीच ठार झाला.

हा अपघात रविवारी १७ रोजी पहाटे ३.१५ च्या सुमारास घडला. अपघातग्रस्त जीए ०७ एफ ३९९० क्रमांकाची वेगनार ही पर्यटक कार घेऊन चालक संतोष हा पर्यटकांना कळंगुट येथे सोडण्यासाठी गेला होता. पर्यटकांना त्यांच्या हॉटेलवर सोडून ही कार पणजीच्या दिशेने जात होती.

वाटेत पर्वरी येथे गौरी पेट्रोलपंप समोर जीए ०४ टी ६७३२ क्रमांकाचा ट्रक ब्रेकडाऊन होऊन बंद पडला होता. चालक केशव नाईक (कुडाळ) यांनी हा ट्रक महामार्गाच्या बाजूने पार्क होता. महामार्गावरून जाणाऱ्या एका कंटेनरला ओव्हारटेक करताना भरधाव कार त्या ट्रकला मागून जोरदार धडकली. त्यामुळे कारच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला आणि त्यामध्ये अडकून चालक जागीच ठार झाला.  

अपघाताची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने कारमध्ये अडकून पडलेल्या वाहन चालकाला बाहेर काढले. गोमेकॉत दाखल करतास त्यास मृत घोषित करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक प्रतिक भटप्रभू व हवालदार सुभाष गावस यांनी अपघाताचा पंचनामा केला. संध्याकाळी शवविच्छेदेनंतर मयताचा मृतदेह कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे पण वाचा...