रेल्वे रुळ ओलांडताना मालगाडीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th September 2023, 11:38 pm
रेल्वे रुळ ओलांडताना मालगाडीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

मडगाव : येथील सिनेलता परिसरानजीकच्या रेल्वे रुळावर मालगाडीने धडक दिल्याने दुपारी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. राजीव चौहान (४२) असे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे रुळ ओलांडताना गाडीच्या धडकेने राजीव जखमी झाला होता.

सध्या डोंगरी नावेली परिसरात राहणारा राजीव चौहान मूळ आझमगड उत्तरप्रदेश येथील आहे. शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मडगाव रेल्वेस्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या धडकेने राजीव रुळावर पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गाडीच्या चालकाने रेल्वे सुरक्षा दलाला याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णवाहिकेतून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील शवागारात ठेवण्यात आला आहे. या अपघाताच्या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील मालगाडी सुमारे तीन मिनिटे थांबून राहिली व त्यानंतर पुढे मार्गक्रमण केले.

रेल्वेच्या धडकेने राजीव चौहान याचा मृत्यू झाल्यानंतर मडगाव शहरातून खारेबांध परिसरात रेल्वे रुळावरुन जाणाऱ्या वाटा बंद करण्यात आल्या. रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या बाजूला पटकन जाता येत असल्याने नागरिक रेल्वे रुळ ओलांडण्याचे धाडस करतात. अपघात रोखण्यासाठी पदपुलांचा वापर करण्यात यावा, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आले आहे.