तयारी गणरायाच्या स्वागताची

आपली भूमी आणि संस्कृती इतकी समृद्ध आहे की आपण प्रत्येक सण अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करतो. भारतात अनेक सण साजरे केले जातात. त्यामुळे प्रत्येक सणावारासाठी वेगळे कसे दिसावे हे ठरवणे कधीकधी कठीण होते. हे सणवार अनुभवताना सुंदर आणि आत्मविश्वासू दिसणेही खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व सण साजरे करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारणही तेच असते.

Story: फॅशन पॅशन | प्राजक्ता पुंडलिक गांवकर |
01st September 2023, 10:27 pm
तयारी गणरायाच्या स्वागताची

सुखकर्त्या गणरायाच्या आगमनाचा मुहूर्त आता जवळ येऊन ठेपला आहे. येत्या गणेश चतुर्थीच्या आनंदी, उत्साही आणि उत्सवी वातावरणात आपला स्टायलिश पेहराव निवडताना विचारात घेण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण पाहूयात.

१. रंग असावा उत्साहाचा

गणेश चतुर्थीसाठी तुमच्या पारंपरिक पेहरावातून उत्सवाच्या आनंदी आणि उत्साही स्वरूपाचे प्रतिबिंब दिसू द्या. लाल, पिवळा, नारिंगी किंवा हिरवा असे रंग यावेळी खुलून दिसतात.

२. पेहराव पारंपरिक तर कापडही पारंपरिकच

रेशीम, कापूस किंवा चंदेरीपासून बनवलेला पेहराव भयंकर उकाड्यातही आरामदायक ठरतो. आपला सांस्कृतिक वारसा सिल्क साड्या, कॉटन सलवार सूट किंवा लिनेन कुर्ता सेटमधून आणखीनच उठून दिसतो.

३. आरामाचा विचार करा

सणावाराच्या गडबडीत स्टाईलबरोबरच आरामाला प्राधान्य देणे तितकेच महत्त्वाचे आहे. भरपूर दागिने आणि हालचालींना अडथळा ठरतील असा पेहराव टाळा. पेहराव शक्यतो ब्रीदेबल कापडापासून बनवलेला असावा.

४. छोट्या तपशिलांची मोठी गोष्ट

पारंपरिक पेहराव म्हटला की, तपशीलवार केलेलं नाजूकसं नक्षीकाम हे आलंच. गणेश चतुर्थीसाठी सुंदर ब्लॉक प्रिंट्स, जरी, मिरर ऍक्सेंट किंवा एम्ब्रॉयडरी वर्क असलेला पेहराव निवडा. हे छोटे छोटे टचही तुमच्या गणेश चतुर्थीला स्टायलिश लुक देऊ शकतात.

५. फ्यूजन फॅशन

वर क्लासिक कुर्ता आणि खाली स्टायलिश प्लाझो किंवा धोती पँट असा फ्युजन लूक तुम्ही यावेळी नक्कीच ट्राय करू शकता. त्याला अधिक परिपूर्णता आणण्यासाठी सोबत स्टेटमेंट ज्वेलरी असेल तर तुमच्या पारंपरिक पेहरावाला आधुनिकतेची स्टायलिश झालर चढते.

६. दागिने

तुमची दागिन्यांची निवड तुमचा लुक खुलवते किंवा बिघडवते. पारंपरिक दागिन्यांसोबत मोठे झुमके, नक्षीदार चोकर्स किंवा लेयर्ड नेकलेस असे कन्टेम्पररी ज्वेलरी पिसेस तुमचा लुक आकर्षक बनवतात. त्यावर मेहंदी म्हणजे सोने पे सुहागाच!

सणांचे हे रंग तुमच्या पेहरावासोबतच तुमच्या हृदयात जिवंत ठेवा आणि सणांच्या हंगामाचा आनंद घ्या.