गोवा-मुंबई वंदे भारत सुटणार मडगाव स्थानकावरून

गाडी मडगावात दाखल : पुढील दोन दिवसांत उद्घाटन शक्य


29th May 2023, 12:22 am
गोवा-मुंबई वंदे भारत सुटणार मडगाव स्थानकावरून

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : मडगाव ते मुंबईपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस गाडी लवकरच सुरू केली जाणार असल्याने गोव्यातून मुंबईचा प्रवास आता आणखी कमी वेळेत पूर्ण होणार आहे. यासाठी भारतीय बनावटीची वंदे भारत आठ डब्यांची गाडी मडगाव रेल्वेस्थानकात दाखल झालेली आहे. उद्घाटनापर्यंत ही गाडी मडगावातच राहणार आहे. पुढील दोन दिवसांत गाडी सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर लवकरच वंदे भारत ही एक्स्प्रेस गाडी सुरू केली जाणार आहे. याआधी १६ मे रोजी मुंबई ते मडगाव या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. यावेळी सकाळी ५.५० वाजता मुंबईहून सुटलेली वंदे भारत गाडी १० वाजता रत्नागिरी स्थानकावर, १२ वाजता सावंतवाडी स्थानकावर त्यानंतर १२,५० वाजता मडगाव रेल्वेस्थानकावर पोहोचली. या मार्गावर साधारण ८५ ते ९५ किलोमीटर प्रतितास या वेगाने गाडीचा वेग होता, तर ७ तासांत ही गाडी मुंबईहून मडगावात दाखल झाली.

गोव्यातून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत या गाडीचा शुभारंभ याआधी २९ मे रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्याने अजूनही रेल्वे प्रशासनाला याची कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले. मात्र, पुढील दोन दिवसांत वंदे भारत या गाडीचा शुभारंभ मडगाव रेल्वेस्थानकावरून होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. त्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसची आठ डब्यांची गाडी मडगाव रेल्वेस्थानकात आलेली आहे. उद्घाटनाचा कार्यक्रमासाठी ही गाडी पाठवण्यात आलेली आहे.

मडगाव स्थानक सजले

कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या अशा मडगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत या गाडीची सुरुवात केली जाणार आहे. वंदे भारतचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने स्थानक परिसराची रंगरंगोटी करण्यात आलेली असल्याने मडगाव रेल्वेस्थानक परिसराचे रुप बदलून गेलेले आहे. परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्सिंग झाले असून परिसरातील शेड, संरक्षक भिंत, बसस्थानक, पार्किंग प्रकल्प व गाळे यांनाही रंग देण्यात आलेला आहे.

अवघ्या ७ तासांत मुंबईला

आतापर्यंत मुंबई ते गोवा मार्गावर वेगाने धावणारी एक्स्प्रेस ही जनशताब्दी एक्स्प्रेस आहे. जनशताब्दीला साधारण ८.३० ते ९ तासांचा वेळ मुंबई ते गोवा हे अंतर कापण्यासाठी लागतो त्यामुळे वंदे भारत ही गाडी ७ तासांत गोव्याहून मुंबईला पोहोचल्यास प्रवाशांचा सुमारे दीड ते दोन तासांचा वेळ वाचणार आहे.