बेकायदा मदरशावरून ग्रामसभेत वाद

रुमडामळ ग्रामसभा गाजली : पंचाच्या अंगावर धावले विरोधक


29th May 2023, 12:18 am
बेकायदा मदरशावरून ग्रामसभेत वाद

पंच विनायक वळवईर यांच्या अंगावर जाणार्‍या नागरिकांना रोखताना पोलीस. (संतोष मिरजकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : रुमडामळ दवर्लीच्या ग्रामसभेत रविवारी बेकायदा मदरशाचा मुद्दा पुन्हा वादळी ठरला. सरपंच व इतरांकडून स्टॉप नोटीस काढण्यात मागेपुढे केले जात असल्याचे पाहून पंच विनायक वळवईकर यांनी हे प्रकार बंद न केल्यास सदर घरासमोर डुक्कर टाकणार, असे वक्तव्य केल्यानंतर उपस्थित विरोधक त्याच्या अंगावर धावले. उपस्थित पोलिसांनी मध्यस्ती केली. त्यामुळे महिनाभरात यावर निर्णय घेण्याचे ठरवत ग्रामसभा आटोपती घेण्यात आली.

रुमडामळ दवर्ली पंचायतीच्या सभागृहात रविवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती. या ग्रामसभेत पंचायतीच्या प्रभाग ३ मध्ये एका घरात बेकायदेशीर मदरसा सुरू असून त्याठिकाणी काय चालते याची कुणालाही खबर नाही. यासंदर्भात मार्चमध्ये झालेल्या ग्रामसभेत तीन महिन्यात सदरप्रकरणी निर्णय घेण्याचे ठरले होते. सदर घरमालकाने गटविकास अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात अपील केले आहे, हे कारण देत पंचायतीकडून कोणताही निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावरून पंच विनायक वळवईकर यांनी हा प्रकार बंद न झाल्यास कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. बेकायदा मदरसा बंद करण्याची मागणी मागच्यावेळी केलेली होती, असे वळवईकर यांनी सांगितले, तर विरोधी पक्षातील नागरिकांनी सदर घरात कोणत्याहीप्रकारचे गैरकृत्य चालत नाही. अरबी, उर्दू शिकवणे व शैक्षणिक वर्गाशिवाय त्याठिकाणी काहीही केले जात नाहीत. सदर संस्थेच्या कार्यासाठी याआधी पंचायतीचा ना हरकत दाखला घेण्यात आलेला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात तो कोणत्याही कारणाशिवाय दाखला रद्द करण्यात आला. त्यानंतर पुन्हा ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केलेला असून पंचायत मंडळ त्यावर निर्णय घेत नसल्याचे सांगितले.

पंच विनायक वळवईकर यांनी सांगितले की, ना हरकत दाखला नसताना कोणतीही संस्था काहीही करू शकत नाही. घर असले तरी त्यात केल्या जाणाऱ्या कृत्याबाबत शंका येण्यासारखी असल्याने ही वेळ आलेली आहे. हरकत घेतल्यानंतर तत्काळ स्टॉप नोटीस काढण्याची गरज होती. पण पंचायत मंडळ यात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वळवईकर यांनी केला. हे प्रकार न थांबल्यास डुक्कर त्याठिकाणी आणून टाकणार असे वक्तव्य वळवईकर यांनी केले. यानंतर उपस्थित संस्थेचे पदाधिकारी व विरोधक संतप्त झाले. त्यांनी विनायक यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. वळवईकर यांच्या समर्थकांनीही गर्दी केलेली होती. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या समर्थकांना बाजूला करत हातघाईवर आलेला हा प्रकार थांबवला.

चर्चा, सुनावणीनंतर निर्णय !

पंचायतीकडून पुढील महिनाभराच्या कालावधीत प्रभाग तीनमधील नागरिकांशी चर्चा करून प्रभागातील चाललेल्या प्रकाराबाबत मते घेतली जातील व त्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले. पंचायतीला बीडिओ कार्यालयाकडून नोटीस आलेली असून सदर संस्थामालकाने बीडिओंकडे अपील केलेले असल्याने त्यावरील सुनावणीवरही पंचायतीचा निर्णय अवलंबून राहणार असल्याचे फनीबंध यांनी सांगितले.                                   

हेही वाचा