ब्रिटिश महिलेवर अत्याचाराच्या आरोपातून संशयित निर्दोष

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा दावा सिद्ध करण्यात अपयश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th May 2023, 11:56 pm
ब्रिटिश महिलेवर अत्याचाराच्या आरोपातून संशयित निर्दोष

पणजी : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा दावा सिद्ध करण्यास तसेच पीडित ब्रिटिश महिलेची फसवणूक केल्याचे सिद्ध करण्यासही फिर्यादी अपयशी ठरल्याचे निरीक्षण उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणी न्यायालयाने संशयित समीर कपूर उर्फ अफताब अहमद बहाउद्दीन (आजमगड उत्तरप्रदेश) याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.

या प्रकरणी महिला पोलीस स्थानकाने १ ऑक्टोबर २०१६ रोजी गुन्हा दाखल केला होता. संशयित समीर हा ७ सप्टेंबर २०१६ रोजी गोव्यात आला. त्यानंतर ती दोघे उत्तर गोव्यातील एका रिसोर्टमध्ये राहिली. त्यादिवशी संशयिताने तिथे तिचा विनयभंग केला. त्यानंतर ८ सप्टेंबर २०१६ रोजी सायंकाळी आरोपीने तिला चांदीची अंगठी दिली आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत केला. याशिवाय संशयिताने तिच्या भावाला कंत्राट देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून १ लाख रुपये घेतले. तसेच तिचे अश्लील फोटो पाठवून तिला धमकी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला. याची दखल घेऊन महिला पोलिसांनी संशयित समीर कपूर उर्फ अफताब अहमद बहाउद्दीन याच्या विरोधात भादंसंच्या ३७६(लैंगिक अत्याचार), ४२० (फसवणूक) आणि ५०६ (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयित समीर कपूर याने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळविले. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून संशयित समीर याच्या विरोधात पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात २१ जून २०१८ रोजी आरोपपत्र सादर केले. त्यानंतर न्यायालयाने संशयित समीर याच्या विरोधात १८ जून २०२१ आरोप निश्चित करून खटला सुरू केला. या खटल्याच्या सुनावणी वेळी संशयितांच्या वकिलाने पीडित महिलेची उलटतपासणी केली असता, संशयिताने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवले नाही. याशिवाय संशयिताने तिला चांदीची अंगठी दिल्यामुळे तिने शारीरिक संबंध करण्यास सहमती दिल्याचे सिद्ध केले. याची व इतर युक्तिवादाची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयित समीर कपूर उर्फ अफताब अहमद बहाउद्दीन याला पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. याबाबतचा निवाडा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शबनम शेख यांनी दिला.

पीडित महिला ब्रिटिश नागरिक असून ती घटस्फोटित आहे. तिने पुन्हा लग्न करण्यासाठी एका वधूवर सूचक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. याच दरम्यान संशयित समीर कपूर उर्फ अफताब बहाउदीन याने तिच्याशी संपर्क साधून मैत्री केली.

हेही वाचा