अवयव प्रत्यारोपणासाठी गोमेकॉ ते दाबोळी ग्रीन कॉरिडॉर

गोवा पोलिसांचे देशभरातून कौतुक


29th May, 12:50 am
अवयव प्रत्यारोपणासाठी  गोमेकॉ ते दाबोळी ग्रीन कॉरिडॉर

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : गोवा पोलिसांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) ते दाबोळी विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करून दान मिळालेले अवयव इतर ठिकाणच्या शस्त्रक्रियांसाठी वेळेत पोहोचवले. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या कामाचे देशभर कौतुक होत आहे.      

यासंदर्भात वाल्सन म्हणाले, गोमेकॉत मृत झालेल्या व्यक्तीचे यकृत, मूत्रपिंड असे अवयव दान करण्याचा निर्णय त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी घेतला. या कामी मदत करण्याची विनंती ‘सोटो’च्या संयुक्त संचालक डॉ. प्रीती वर्गीस यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी गोमेकॉ ते दाबोळी विमानतळापर्यंत कॉरिडोर तयार करत अवयव वेळेत दाबोळी विमानतळापर्यंत पोहोचवले. याकामी गोमेकॉ व्यवस्थापनाचीही मदत मिळाली, असे ते म्हणाले.       

गोमेकॉ ते दाबोळी महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते, वाहतुकीची कोंडी होत असते. अशा परिस्थितीत अवयव वेळेत विमानतळापर्यंत पोहोचवण्यात काही अडचणी आल्या नाहीत का असा प्रश्न केला असता, अवयव वेळेत विमानतळापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्याचा निर्णय पोलिसांनी अगोदरच घेतला होता. त्यानुसार गोमेकॉ, सोटो संस्था यांची मदत घेऊन हे अवयव विमानतळापर्यंत पोहोचवण्यात आले, असे वाल्सन यांनी नमूद केले.

दरम्यान, अवयव दान केलेल्या १९ वर्षीय युवकाला २० मे रोजी गोमेकॉत डोक्याला झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना २६ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेत, गोमेकॉ व हेल्थवेला प्रत्येकी एक मूत्रपिंड, यकृत अहमदाबादला, तर हृदय मुंबई येथील इस्पितळांत प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा