आईपणाची स्टायलिश चाहूल

आपल्यात एक नवीन जीव वाढतोय हे होणाऱ्या आईसाठी जरी आनंददायी असले तरी त्या पूर्ण गरोदरपणाचा काळाचा ती मनमुराद आनंद घेऊ शकत नाही याचे एक कारण म्हणजे तिच्या मापात न बसणारे कपडे! या दिवसात कपडे निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला या दिवसातही एक स्टायलिश 'भावी आई' म्हणून मिरवता येईल.

Story: फॅशन पॅशन । प्राजक्ता पुंडलिक गांवकर |
26th May, 11:44 pm
आईपणाची स्टायलिश चाहूल

प्रेग्नन्सी वेअरचा कम्फर्टेबल आणि स्ट्रेची पोत’

या काळात बाईने कम्फर्टेबल असणं सगळ्यात महत्त्वाचं असल्याने ऋतूप्रमाणे नेहमी हलके आणि हवेशीर कपडे निवडावेत. कॉटन लायक्रा, डेनिम, रेयॉन, जॉर्जेट आणि लिनन कपडे निवडणे योग्य. सेन्सिटिव्ह किंवा ऍलर्जीक त्वचेसाठी ऑर्गनिक कॉटन वापरावेत. सिंथेटिक कपड्यांमुळे जास्त घाम येणे, खाज येणे किंवा त्वचेवर चट्टे येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे ते टाळणे कधीही योग्यच. त्याचप्रमाणे हेव्ही एम्ब्रॉयडरी किंवा जरीकाम टाळावे.

गरोदरपणात महिन्यांगणिक कपड्यांचे माप वाढत जाते त्यामुळे स्ट्रेचेबल कपडे आपल्या वॉर्डरोबमध्ये असणे गरजेचे आहे. हे कपडे रक्ताभिसरणासाठी आणि हालचालीस योग्य असतात. अशा प्रकारात कॉटन आणि स्पॅन्डेक्स ब्लेंडेड कपडे वापरणे कधीही उत्तम.

मॅटर्नीटी पँट किंवा जीन्सची निवड

दोन किंवा तीन तऱ्हेच्या मॅटर्नीटी जीन्स किंवा पँट तुमच्या वॉर्डरोबमध्ये तिन्ही तिमाहीत असणे गरजेचे आहे. या पँटमध्येसुद्धा विविध प्रकार आजकाल बाजारात सहज उपलब्ध असतात. तुमच्या परफेक्ट फिटिंग आणि स्टायलिंगसाठी तुम्ही या प्रकारातून वेगळ्या अशा पण तुमच्यासाठी योग्य त्या पँट निवडू शकता. शक्यतो झिपर्स आणि बटनपेक्षा स्ट्रेची जीन्सची निवड करा.

आरामदायी मॅटर्नीटी टॉप्स

मॅटर्नीटी टॉप्स हे आरामदायी असतात. प्रेग्नन्सी टॉप्स आणि ट्युनिक्सपासून मॅटर्नीटी कुर्ता-कुर्तीपर्यंत अनेक प्रकार आजकाल उपलब्ध असतात. ते प्रेग्नन्सीच्या काळात तुम्हाला आरामशीर वाटतील असेच डिझाईन केलेले असतात. यात असे टॉप्स निवडा जे तुम्हाला प्रेग्नन्सीत तसेच त्यानंतरही वापरता येतील. संध्याकाळी बाहेर जाताना घालण्यासाठी तुम्ही मॅटर्नीटी मॅक्सी ड्रेस तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवू शकता. अशा ड्रेसेसचे काहीसे ढगळ फिटिंग तुम्हाला पूर्णवेळ आरामदायी ठेवते आणि त्याचसोबत तुमच्या पोषाखात एक नाजूकपणाही येतो.

लेगिन्समध्ये दिसा स्टायलिश

मॅटर्नीटी लेगिन्ग्स एवढे आरामदायी असतात की तुम्ही त्यात अक्षरशः मुक्तपणे वावरू शकता आणि या तुम्ही बाळंतपणानंतरही वापरू शकता. लेगिन्स या वेगवेगळ्या प्रकारात मिळतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल केल्या जाऊ शकतात.

तुम्ही तुमच्या आवडत्या लेगिन्ग्स विविध मॅटर्नीटी टीशर्ट्स, जॅकेटसोबत घालू शकता आणि त्यासोबत आरामदायी फुटवेअर जसे की स्नीकर्स, लोफर्स, ओव्हर द नी किंवा अँकल बूट, फ्लॅट्स आणि सॅंडल्स ट्राय करू शकता.

स्ट्रेची टीशर्ट वापरा

जर तुम्ही मॅटर्नीटी कपडे घेण्याचा विचार करत असाल तर असे कपडे निवडा ज्यात तुमची वाढती गोलाई उठावदार दिसेल. त्यासाठी प्रेग्नन्सी टीशर्ट तुमच्या रोजच्या वापरासाठी अगदी योग्य निवड ठरू शकेल. प्रेग्नन्सी जीन्स, लेगिन्ग्स, पँट्स, शॉर्ट्स किंवा एखाद्या हलक्या जॅकेटसोबत तुम्ही हे टीशर्ट्स वापरू शकता.

या काही अगदी बेसिक फॅशन टिप्स आहेत ज्या तुम्हाला तुमचा गरोदरपणाचा काळ हा थोडा आरामशीर आणि स्टायलिश करण्यात मदत करू शकतील. हा काळ तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा काळ असल्याने या स्टायलिंग टिप्सचा फायदा घेत तुम्ही तुमचा हा काळ आणखी आनंदाने साजरा करू शकता.