नव्या पूर्व प्राथमिक शाळांसाठी एकूण ५२ अर्ज स्वीकारले

‘पीएश्री’अंतर्गत उभारणार १३ मॉडेल स्कूल; मुख्यमंत्र्यांची माहिती


28th March 2023, 12:32 am
नव्या पूर्व प्राथमिक शाळांसाठी एकूण ५२ अर्ज स्वीकारले

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : येत्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याने एकूण ५२ अर्ज स्वीकारले आहेत. पीएश्री योजनेअंतर्गत विविध तालुक्यांत सरकार १३ मॉडेल पूर्व प्राथमिक सरकारी शाळा सुरू करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी विचारलेल्या लेखी​ प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.             

पहिली ते चौथीपर्यंत पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याने ५२ अर्ज स्वीकारले आहेत. त्यात कोकणी माध्यमासाठीच्या २१, इंग्रजीसाठीच्या १४, मराठीसाठीच्या १०, उर्दूसाठी ५ आणि उर्दू-इंग्रजी व हिंदी माध्यमासाठीच्या प्रत्येकी एका अर्जाचा समावेश आहे. गोवा शालेय शिक्षण कायदा १९८४ च्या नियम ३१ नुसार प्रक्रिया पूर्ण न केल्याने मराठी​ आणि कोकणीसाठीच्या प्रत्येकी​ एक, असे दोन अर्ज शिक्षण खात्याने फेटाळले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे.             

दरम्यान, केंद्र सरकारच्या पीएश्री योजनेअंतर्गत राज्यात मॉडेल शाळा उभारण्यावर भर देण्याची हमी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गेल्या अर्थसंकल्पात दिली होती. त्यानुसार राज्य सरकारने विविध तालुक्यांत १३ मॉडेल पूर्व प्राथमिक सरकारी शाळा सुरू करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

कायमस्वरूपी​ शिक्षकांची २०० पदे रिक्त    

विविध सरकारी प्राथमिक शाळांत २०० कायमस्वरूपी​ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. त्यांतील १४२ कायमस्वरूपी शिक्षक आणि ३६ प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांची पदे भरण्यासाठीची प्रक्रिया सरकारने गतिमान केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार क्रूज सिल्वा यांच्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे. 

हेही वाचा