विरोधकांच्या भीतीमुळेच अधिवेशनाचा कार्यकाळ कमी!

विराेधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th March 2023, 12:12 am
विरोधकांच्या भीतीमुळेच अधिवेशनाचा कार्यकाळ कमी!

मडगाव : सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात राज्य सरकारने कार्यक्रमांवर आणि जाहिरातींवर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांची आकडेवारी समोर येणार आहे. या अधिवेशनात अपयशी भाजप सरकारचा खरा चेहरा समोर येईल, या भीतीनेच अधिवेशन कार्यकाळात कपात केली आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात सरकारचे अपयश, आपत्ती व्यवस्थापन, म्हादईच्या मुद्द्यावर जाणीवपूर्वक केलेली डोळेझाक, जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, दिवाळखोरीमुळे सरकारी खात्यांतील रिक्त पदे भरण्यास आलेले अपयश, कार्यक्रम आणि प्रसिद्धीवर केलेली अनेक कोटींची उधळपट्टी याचा तपशील आम्ही उघड करणार आहोत, असे युरी आलेमाव म्हणाले.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील बेकायदेशीर कारभार, प्रदूषण तसेच अतिक्रमण, कुंकळ्ळीसाठी आरोग्य सुविधा, वाहतूक कोंडी, कुंकळ्ळी मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची निश्चिती या प्रमुख समस्या माझ्या यादीत आहेत, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

शॅक ऑपरेटर्स, अनुसूचित जमातींचे शिष्टमंडळ, दिव्यांग व्यक्ती, महिला संस्था, नागोवा-वेर्णा रहिवासी, भोमा रहिवासी आणि इतरांकडून विविध निवेदने मिळाली आहेत. त्या सर्वांचा आवाज विधानसभेत ऐकला जावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे युरी आलेमाव म्हणाले.