घरांसह धार्मिक स्थळे, शाळांना कचरा करातून सूट

कोलवा ग्रामसभेत निर्णय : कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th March 2023, 12:11 am
घरांसह धार्मिक स्थळे, शाळांना कचरा करातून सूट

मडगाव : कोलवा पंचायतीतील सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, पण ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नाही. तसेच शाळा, महाविद्यालय, चर्च, मंदिर व इतर धार्मिक स्थळांना कचरा करातून सूट देण्यावरही चर्चा झाली. तसेच स्थानिक नागरिकांच्या घरांनाही कचरा करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच सुझी फर्नांडिस यांनी ग्रामसभेनंतर दिली.

कोलवा पंचायतीच्या ग्रामसभेत नागरिकांची विकासकामांबाबत जे अर्ज आले होते, त्यावर चर्चा करण्यात आली. ओल्या कचऱ्याचा प्रश्नावर चर्चा झाली. ओला कचरा टाकण्यासाठी साठवणुकीसाठी पंचायत क्षेत्रात जागा उपलब्ध होत नाही. गावातील नागरिकांकडून जर जागा उपलब्ध करुन देण्यात येत असल्यास ती खरेदी करण्यास पंचायत मंडळ तयार आहे, असे ग्रामसभेत पंचायत मंडळाकडून सांगण्यात आले. याशिवाय कोलवा पंचायतीतील कचरा टाकण्यात येत असलेल्या ब्लॅक स्पॉटवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद पंचायत मंडळाकडून करण्यात आलेली असल्याने कॅमेरा खरेदी करुन त्याद्वारे कचरा ब्लॅक स्पॉटवर बसवण्यात येतील. पंचायतीच्या परिक्षेत्रातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबतही चर्चा झाली. त्यावेळी सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी रस्त्याच्या हॉटमिक्सिंगबाबत चर्चा झालेली असून लवकरच गावातील रस्त्यांची कामे होतील, असे स्पष्ट केले. कचऱ्याच्या शुल्क किती घ्यावे याबाबत प्रस्ताव आलेला होता. मात्र, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, पुढील ग्रामसभेत कचरा शुल्क ठरवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट कले.

शाळा, महाविद्यालये, मंदिरे, चर्च, मशिद यांना कचरा शुल्क देण्यातून सूट देण्यात येणार आहे. त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. याशिवाय याआधी झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत स्थानिक रहिवाशांच्या घरांनाही कचरा शुल्कातून मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गावातील हॉटेल आस्थापनांकडून खोलींच्या संख्येनिहाय कचरा शुल्क ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती पंच मिनिनो फर्नांडिस यांनी सांगितले.