कालिझोर-मयडे येथे मोबाईल टॉवरला विरोध करणारे ग्रामस्थ.
म्हापसा : कालिझोर-मयडे येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात उभारण्यात येणार्या मोबाईल टॉवरला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. या टॉवरचे दुष्परिणाम शाळेतील लहान विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांना भोगावे लागतील, असा दावा आंदोलक रहिवाशांनी केला आहे.
हळदोणाचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. रहिवासी मोनीला डिसोझा म्हणाल्या, आपले घर शाळेच्या शेजारीच असून मोबाईल टॉवरचा जास्त दुष्परिणाम आम्हाला होईल. संगम म्हापसेकर यांनीही या टॉवरला विरोध केला. मयडे गाव म्हापसा शहरापासून जवळ अंतरावर आहे. त्यामुळे येथे योग्य प्रमाणात मोबाईलचे नेटवर्क आहे. तसेच गावात यापूर्वीच चार टॉवर असल्याने अजून टॉवरची गरज नाही. सध्या अतिरिक्त टॉवराची उभारणी करण्या मागचे नेमके कारण ग्रमस्थांना समजायला हवे.
गेल्या १५ दिवसांपूर्वी असाच टॉवर उभारण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन विरोध केला होता. आता पुन्हा प्रयत्न होत आहे. मोबाईल टॉवरची उभारणी करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज असते, असे रामा साटेलकर यांनी सांगितले.
आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी टॉवरला विरोध करणार्या लोकांशी चर्चा केली. शाळेच्या शेजारी मोबोईल टॉवरची उभारणे चुकीचे आहे. ग्रामस्थांनी घेतलेली हरकत योग्य असून चुकीच्या ठिकाणी टॉवर उभारला जात आहे. सरकारचा शाळा बंद करण्याचा हा प्रयत्न असून सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याचा हा हेतू असल्याचा आरोप अॅड. फेरेरा यांनी केला.