ऑस्ट्रेलियाची कसोटीला सावध सुरुवात

उस्मान ख्वाजाचे शतक : पाहुण्यांच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५५ धावा

|
09th March 2023, 11:42 Hrs
ऑस्ट्रेलियाची कसोटीला सावध सुरुवात

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

अहमदाबाद : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसअखेर पाहुण्या संघाने ४ गडी गमावून २५५ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर उस्मान ख्वाजाने भारताविरुद्धच्या कसोटीतील पहिले शतक झळकावले. 

ख्वाजा १५ चौकारांच्या मदतीने १०४ धावा करून नाबाद परतला. कॅमेरून ग्रीन त्याच्यासोबत ४९ च्या वैयक्तिक स्कोअरवर नाबाद परतला. ट्रॅव्हिस हेड (३२), मार्नस लॅबुशेन (३), पीटर हँड्सकॉम्ब (१७) आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ (३८) यांच्या रूपाने संघाने पहिल्या दिवशी एकूण चार विकेट गमावल्या.

भारतीय फिरकीपटू अपयशी

सामन्याच्या पहिल्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळाली नाही. भारताकडून महम्मद शमीने २ बळी घेतले. त्याचवेळी रवींद्र जडेजा आणि अश्विन यांना प्रत्येकी १ असे यश मिळाले. पहिल्या दिवशी खेळपट्टी फलंदाजांसाठी अतिशय अनुकूल होती. शमीने मार्नस लॅबुशेन आणि पीटर हँड्सकॉम्बला बोल्ड केले. याशिवाय जडेजाने विरोधी संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचे दांडे विखुरले.

ऑस्ट्रेलियाची संथ पण दमदार फलंदाजी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मजबूत स्थितीत दिसले. ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लॅबुशेन अवघ्या ३ धावा करून महम्मद शमीचा बळी ठरला. यानंतर ख्वाजाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. या दोघांनी मिळून पहिल्या सत्रात संघाला २ बाद ७५ धावांपर्यंत नेले. या सामन्यात रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला आपला शिकार बनवले. मात्र ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवशी फलंदाजी खुपच संथ होती.

महम्मद शमी यशस्वी गोलंदाज

या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज अपयशी दिसले. महम्मद शमीने १७ षटकांत ६५ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय उमेश यादवने १५ षटकांत ५८ धावा दिल्या आणि त्याला यश मिळाले नाही. त्याचवेळी रवींद्र जडेजा आणि अश्विन यांनी अनुक्रमे ४९ आणि ५७ धावा देऊन प्रत्येकी १ बळी घेतला. अक्षर पटेलही विकेट घेण्यात अपयशी ठरला. त्याने १२ षटकांत १४ धावा दिल्या. त्याचवेळी श्रेयस अय्यरनेही एक ओव्हर टाकली, ज्यामध्ये त्याने २ धावा खर्च केल्या.

भारतात १३ वर्षांनंतर शतक

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजाने अहमदाबादमध्ये चमत्कार घडवला. ऑस्ट्रेलियाच्या या सलामीवीराने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शानदार शतक झळकावले. आश्चर्यकारक संयम आणि एकाग्रता दाखवत ख्वाजाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन डाव तर रोखून धरलाच, पण कोणत्याही कांगारू फलंदाजाच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टी त्याने केल्या.

ख्वाजासाठी हे शतक खूप खास आहे. खरे तर, उस्मान ख्वाजाने कसोटी क्रिकेटमध्ये १४व्यांदा शतक झळकावले आहे आणि भारतीय भूमीवर पहिल्यांदाच त्याच्या बॅटमधून शतक झळकले आहे. उस्मानने आशियाई भूमीवर चौथ्यांदा शतक झळकावले. त्याने यापूर्वी पाकिस्तान, यूएईमध्ये शतक झळकावले आहे. आणि आता या खेळाडूने भारताच्या दर्जेदार गोलंदाजीसमोर शतक ठोकले आहे. भारतात १३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन डावखुऱ्या फलंदाजाने शतक झळकावले आहे. मार्कस नॉर्थने शेवटच्या वेळी २०१०-११ मध्ये हा पराक्रम केला होता.

उस्मान ख्वाजाने या वर्षातील दुसरे कसोटी शतक झळकावले आहे. यापूर्वी सिडनीमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. उस्मान ख्वाजाही या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या खेळाडूने आतापर्यंत १ शतक आणि २ अर्धशतके झळकावली आहेत.