मंत्र्याच्या हत्येप्रकरणी चौकशीचे आदेश

|
31st January 2023, 12:09 Hrs
मंत्र्याच्या हत्येप्रकरणी चौकशीचे आदेश

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबकिशोर दास (६०) यांच्या मृत्यूप्रकरणी हल्लेखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

नबकिशोर दास हे झारसुगुडा जिल्ह्यात दौऱ्यावर असताना रविवारी सकाळी पोलीस अधिकारी गोपाल दास याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. रात्री उशिरा त्यांची मृत्यूशी झुंज संपली.

दरम्यान, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नबकिशोर दास यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. झारसुगडा जिल्ह्यातील ब्रजराजनगर शहरात एका कार्यक्रमासाठी आरोग्यमंत्री नब किशोर दास निघाले होते. लोकांना अभिवादन करण्यासाठी ते मोटारीतून उतरले असता सहायक पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. नंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

गोळीबार करणारा पोलीस अधिकारी गोपाल दास मनोरुग्ण असल्याचा दावा त्याची पत्नी जयंती हिने केला. गेल्या सात-आठ वर्षांपासून त्याला मानसिक आजार होता. उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारली होती. सकाळी त्याने आपल्या मुलीला व्हिडिओ कॉलही केला होता, असे जयंती यांनी सांगितले.