पेशावरमधील मशिदीत स्फोटात ३२ पोलीस ठार, १५८ जखमी

टीटीपीने स्वीकारली स्फोटोची जबाबदारी; ५५० नमाजींमध्ये बसलेला हल्लेखोर


30th January 2023, 11:56 pm
पेशावरमधील मशिदीत स्फोटात ३२ पोलीस ठार, १५८ जखमी

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

पेशावर : पाकिस्तानातील पेशावर शहरातील पोलीस लाइन्समध्ये बांधलेल्या मशिदीत स्फोट झाला. याला आत्मघातकी हल्लाही म्हटले जात आहे. स्थानिक मीडिया खैबर वृत्तानुसार, आतापर्यंत ३२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर १५८ जण जखमी झाले आहेत. ९० जणांची प्रकृती चिंताजनक अाहे.

हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. त्याच्या जवळच लष्कराच्या तुकडीचे कार्यालयही आहे. या स्फोटचा आवाज २ किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला.

टीटीपीने स्वीकारली जबाबदारी

पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजनुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नमाजच्या वेळी मशिदीमध्ये सुमारे ५५० लोक उपस्थित होते. येथे प्रवेश करण्यासाठी गेट पास दाखवावा लागत असल्याने तो पोलीस लाइन्समध्ये कसा पोहोचला हे समजू शकले नाही. मशीद कोसळली असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) पाकिस्तानचा या भागात बराच प्रभाव असून यापूर्वी या संघटनेने येथे हल्ल्याची धमकीही दिली होती. या घटनेनंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रक्तदानाचे आवाहन

सर्व जखमींवर पेशावरच्या लेडी हार्डिंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनातून सामान्य नागरिकांनी लवकरात लवकर रक्तदान करण्यासाठी रुग्णालयात पोहोचण्याचे आवाहन केले. लष्करी डॉक्टरांचे पथकही या रुग्णालयात पोहोचले आहे.

टीटीपीच्या निशाण्यावर पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये टीटीपीचे हल्ले वाढत आहेत. गेल्या महिन्यात इस्लामाबादमध्ये आत्मघातकी हल्ला झाला होता. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर शाहबाज शरीफ यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली. बैठकीनंतर गृहमंत्री राणा सनाउल्ला म्हणाले होते की, पाकिस्तान सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. तालिबान सरकारने टीटीपीला रोखले नाही, तर आम्ही अफगाणिस्तानात घुसून या दहशतवाद्यांना ठार करू.

पाकिस्तान सरकारने या हल्ल्यांसाठी टीटीपीला जबाबदार धरले आहे. राणा सनाउल्लाहच्या धमकीला तालिबानचे वरिष्ठ नेते आणि उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी सोशल मीडियावर १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या आत्मसमर्पणचा फोटो शेअर करून प्रत्युत्तर दिले. या आत्मसमर्पणानंतर बांगलादेश वेगळा देश झाला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे झाले.

यासिर यांनी या फोटोसोबत उर्दूमध्ये म्हटले आहे की, राणा सनाउल्लाह, जबरदस्त. हे अफगाणिस्तान आहे हे विसरू नका. हा तो अफगाणिस्तान आहे जिथे महान शक्तींच्या कबरी बांधल्या गेल्या. आमच्यावर लष्करी हल्ल्याची स्वप्ने पाहू नका, अन्यथा परिणाम लाजिरवाणा असेल.