किच्चा सुदीपकडे १२५ कोटींची संपत्ती


05th January 2023, 10:39 pm
किच्चा सुदीपकडे १२५ कोटींची संपत्ती

कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने कन्नड चित्रपट तसेच तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. सुदीपने आपल्या अभिनयाने आणि प्रतिभेने आपली उंची इतकी वाढवली की त्याच्या अभिनयाची पातळी गाठणे कठीण झाले. याच कारणामुळे तो कन्नडचा 'अभिनेता चक्रवर्ती' म्हणून ओळखला जाऊ लागला.
२ सप्टेंबर १९७३ रोजी कर्नाटकातील शिमोगा येथे जन्मलेल्या सुदीपने इंजिनीअरिंग केली आहे. चांगले क्रिकेट खेळतो पण चित्रपटांच्या चमकदार जगाने सुदीपला खूप आकर्षित केले. त्यामुळे सुदीपने रोशन तनेजा यांच्याकडून अभिनय शिकला आणि तो फिल्मी दुनियेचा एक भाग बनला. सुदीपने आपल्या करिअरची सुरुवात कन्नड चित्रपटातून केली होती पण त्याने तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्येही काम केले आहे. सुदीपचे वडील देखील एक चित्रपट निर्माता आहेत.
राजामौलींच्या चित्रपटातून मिळाली ओळख
सुदीपने १९९७ मध्ये 'थायवा' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. पण ओळख एस राजामौली यांच्या ईगा (हिंदीमध्ये मख्खी) या चित्रपटातून मिळाली. २००८ मध्ये सुदीपने राम गोपाल वर्मा यांच्या 'फुंक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुदीपने नंतर रन, फुंक २, रक्तचरित्र भाग एक आणि दोन आणि सलमान खानच्या दबंग ३ मध्ये देखील काम केले.
सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेता
सुदीपने स्पर्श, हुच्छा, वीरा मदकरी, रन, हेब्बुली, द व्हिलन, पैलवान यांसारखे कन्नड चित्रपट केले आहेत. सुदीपला हुच्छा, नंदिनी आणि स्वाती मुथूसाठी सलग तीन वर्षे कन्नड फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
'किच्चा' नावामागेही रंजक कहाणी
सुदीपचे नाव सुदीप संजीव आहे. २००१ मध्ये आलेल्या 'हुच्छा' चित्रपटात त्याने 'किच्चा' ही व्यक्तिरेखा साकारली होती. लोकांना हे पात्र इतके आवडले की, अभिनेत्याने त्याच्या नावामागे किच्चा वापरण्यास सुरुवात केली आणि लोकांना ते आवडलेही.
बहुप्रतिभावान कलाकार
सुदीप हा बहुगुणसंपन्न व्यक्ती आहे. अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शन, गायन आणि पटकथा लेखनातही हात आजमावला आहे. त्याने २० हून अधिक चित्रपटांमध्ये गाणीही गायली आहेत. सुदीपने कन्नडचा बिग बॉसही होस्ट केला आहे. २००१ मध्ये सुदीपने एका एअरलाइन कंपनीत काम करणाऱ्या प्रिया राधाकृष्णनशी लग्न केले. सुदीपला एक मुलगीही आहे. त्याचा एक किच्चा सुदीप चॅरिटेबल ट्रस्ट देखील आहे जो वंचित शाळेतील मुलांना मदत करतो
बंगळुरूमध्ये २० कोटींचा बंगला
सुदीपचा बंगळुरूमध्ये सुमारे २० कोटींचा बंगला आहे. याशिवाय सुदीपची बंगळुरूच्या आसपास जमीन असून त्याच्याकडे गेस्ट हाऊस आहे. याशिवाय सुदीपचे कर्नाटकात फार्म हाऊस असून शेतीसाठी बरीच जमीनही आहे.
गाड्यांची खूप आवड
सुदीपला कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे ३ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी अव्हेंटाडोर, ७५ लाख रुपयांची जीप कंपास, १ कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू एम-३ आणि ९० लाख रुपयांची हमर एच-३ आहे. सुदीपची एकूण संपत्ती १२५ कोटी आहे.