कसलीच कागदपत्रे नसलेल्या सात भाडेकरूंना अटक

थिवीच्या ‘लाला कि बस्ती’मधील प्रकार; घर मालकांवरही गुन्हा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd December 2022, 10:37 pm
कसलीच कागदपत्रे नसलेल्या सात भाडेकरूंना अटक

थिवी येथील ‘लाला की बस्ती’मध्ये कागदपत्रे नसताना वास्तव्य केल्याप्रकरणी अटक केलेल्या भाडेकरूंसह कोलवाळचे पोलीस पथक.

म्हापसा : कोलवाळ पोलिसांनी शनिवारी राबवलेल्या भाडेकरू पडताळणी मोहिमेत औचितवाडा-थिवी येथील ‘लाला की बस्ती’मध्ये ७ भाडेकरूंकडे कसलीच कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय इथे राहणाऱ्या ६० जणांनी पोलिसांकडे पडताळणीसाठी ‘फॉर्म-सी’ भरला नसल्याचेही आढळून आल्याने घरमालकांविरुद्धही गुन्हा नोंद केला आहे.
 
अटक केलेले सात तरुण रंगकाम, सुतार व वेल्डर काम करत होते. त्यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलम ४१ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयितांना पुढील कारवाईसाठी उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, या भाडेकरूंना बेकायदेशीररित्या आपल्या घरात वास्तव्यास ठेवणार्‍या ‘लाला की बस्ती’मधील अर्सद खान, हुसेन, मिथिलेश कुमार गुप्ता या तीन घर मालकांनी पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली भा.दं.सं.च्या १८८ कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर करत आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार परब, कुणाल नाईक, सुशांत सांगोडकर, सहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र सावंत व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

‘लाला की बस्ती’मध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय राहत असल्याची माहिती कोलवाळ पोलिसांना मिळाली होती. या बस्तीत सुमारे ८०० लोक राहत असल्याचे समजते. त्यानुसार पाच पथके तयार करून शनिवारी सकाळपासून पोलिसांनी येथील भाडेकरूंची तपासणी सुरू केली होती. या मोहिमेत दिवसभरात सुमारे ३०० पेक्षा जास्त घरांतील भाडेकरूंची तपासणी करण्यात आली. यांतील ६० जणांनी भाडेकरू पोलीस स्थानकात पडताळणी अर्ज भरला नव्हता. त्यानंतर संबंधितांना पोलीस स्थानकात आणून सर्वांकडून पडताळणी अर्ज भरून घेतला. मात्र, त्याचवेळी ७ जणांकडे कसलीच कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

घरमालक, हॉटेल, गेस्ट हाऊस मालक, कंत्राटदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा भाडेकरू पडताळणी अर्ज येत्या २४ तासांत भरून देण्याचे निर्देश पोलीस स्थानकातून देण्यात आले आहेत. लोकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांत देऊन सहकार्य करावे, असे आवाहन निरीक्षक सोमनाथ माजिक यांनी केले आहे.

अटक केलेल्यांची नावे

बस्तीत राहणाऱ्या चंदन कुमार महेश गोंड (२९, रा. सराया), सिकंदर हैदर अली (२३, रा. नारायणपूर), मेराज निसार अहमद (१९, रा. आमाथरी), अर्शद मोहम्मद हुसेन (२२, रा. आमाथरी), तासौर मोहम्मद हुसेन (२६, आमाथरी) व किशन मदम गुप्ता (२०, रा. देओरीया) या मूळ उत्तर प्रदेशमधील तरुणांना अटक करण्यात आली आहे. तर अनिल नान्हू सिंग (१९, रा. ग्राम बैरागी, मध्यप्रदेश) याचाही यात समावेश आहे.

हेही वाचा