अट्टल गुन्हेगार आगुस्तिन्हो काव्हार्लोस अटक


03rd December 2022, 12:11 am
अट्टल गुन्हेगार आगुस्तिन्हो काव्हार्लोस अटक

 प्रतिनिधी। गोवन वार्ता             

म्हापसा : कळंगुट येथे घरी पोहोचविताे असे सांगून गाडीत बसवून अर्जुन डेदादोलकर (कळंगुट) यांना वाटेत मारहाण करून त्यांची सोनसाखळी आणि रोकड हिसकावून लुबाडण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी आगुस्तिन्हो कार्व्हालो (रा. माजोर्डा) या अट्टल गुन्हेगाराला अटक केली.             

हा प्रकार बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी घडला आहे. फिर्यादी अर्जुन डेदादोलकर हे कळंगुट टिटो जन्कशनवर थांबले होते. त्यांच्याशी संशयित आगुस्तिन्होने ओळख केली व कारमधून फिर्यादीला घरी सोडतो असे सांगून आपल्या कारमध्ये त्यांना बसवले. वाटेत संशयिताने कार थांबवून अर्जुन याला मारहाण केली व धमकी दिली. तसेच त्याच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी आणि खिशातील ९,५०० रुपये मिळून साडे एकोणपन्नास हजारांचा मुद्देमाल लुबाडला व नंतर त्यांना तेथेच टाकून संशयित कारसमवेत पसार झाला होता.             

 या प्रकरणी फिर्यादी अर्जुन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी चौकशी करत दोन दिवसांच्या आत संशयिताला सातिंगणवाट, हरमल-पेडणे येथे पकडून गजाआड केले.  पोलिसांना या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज तसेच आपल्या विश्वसनीय सूत्रांमार्फत ही माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन रात्री कळंगुट पोलिसांनी त्या भागात पाळत ठेवली होती. संशयित शुक्रवारी सकाळी हरमल येथे येताच त्यास पोलीस पथकाने पकडले.             

पोलिसांनी भा.दं.सं.च्या ३२३, ३५६ व ३७९ कलमांखाली संशयित आगुस्तिन्हो यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.            

   पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉन्स्टेबल अमिर गरड, विजय नाईक, गणपत तिळोजी, तसेच उत्तर गोवा कॉल मॉनिटरिंग विभागाचे कॉन्स्टेबल विष्णू राणे व सागर नाईक यांच्यासह हवालदार गोविंद पटनाईक यांनी संशयिताला शोधून काढण्यासाठी मोठी कामगिरी बजावली.