डिचोली आरोग्य केंद्राला तीन डायलेसिस युनिट प्रदान

रुग्णांची होणार गैरसोय दूर : आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती


02nd December 2022, 12:09 am
डिचोली आरोग्य केंद्राला तीन डायलेसिस युनिट प्रदान

डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात डायलेसिस युनिट प्रदान सोहळ्याला उपस्थित आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, डॉ. मेधा साळकर, संजय शेट्ये व इतर.

प्रतिनिधी । गोवन वार्ता

डिचोली : डिचोली आरोग्य केंद्राला आरोग्य खात्यातर्फे तीन नवीन अतिरिक्त डायलेसिस युनिट प्रदान करण्यात आले. गुरुवार, दि. १ डिसेंबर रोजी डिचोली समाजिक आरोग्य केंद्रात हा डायलेसिस युनिट प्रदान सोहळा झाला. या सोहळ्याला आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह कारापूर सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, उपसरपंच तन्वी सावंत, लाटंबार्सेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, आरोग्याधिकारी डॉ. मेधा साळकर, मुत्रपिंड रोगतज्ञ डॉ. शीतल लिंगडे आदी उपस्थित होते.       

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी ३ ऑगस्ट रोजी डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी या केंद्रातील समस्या व इतर आवश्यक वस्तूंची माहिती घेतली होती. या आरोग्य केंद्रात डायलेसिस केंद्र सुरू झाल्यानंतर डायलेसिससाठी रुग्णांची संख्या वाढली होती. चारच युनिट असल्याने अधिक रुग्णांना डायलेसिससाठी घेता येत नव्हते. त्यांना वाळपई किंवा बांबोळी येथे जावे लागत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या आरोग्य केंद्रात अतिरिक्त डायलेसिस युनिट उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती.

  डिचोली आरोग्य केंद्रात सध्या २७ ते २८ रुग्ण डायलेसिस उपचार घेत आहेत. दररोज १२ रुग्णांवर उपचार करता येत होते. रुग्णांची संख्या वाढल्याने युनिटची संख्या वाढवणे गरजेचे होते. त्यासाठी ऑगस्टमध्ये आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या कामाची फाईल आरोग्य खात्याकडे दिली होती. सदर फाईलचा पाठपुरावा करत तीन महिन्यांतच हे युनिट डिचोली आरोग्य केंद्राला उपलब्ध करून दिले. याकामी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे सहकार्य मिळाले, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.