‘ईडी’कडून विजय देवरकोंडाची चौकशी


01st December 2022, 11:15 pm
‘ईडी’कडून विजय देवरकोंडाची चौकशी

विजय देवरकोंडा 'लायगर' चित्रपटामुळे अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाच्या निधीबाबत ईडीने विजय देवरकोंडा याची चौकशी केली आहे. ईडीने कथित फेमा उल्लंघन प्रकरणात अभिनेत्याची चौकशी केली.
१७ नोव्हेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चित्रपट दिग्दर्शक पुरी जगन्नाध आणि अभिनेत्री-निर्माती चार्मी कौर यांची एक दिवस चौकशी केली. या वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या 'लायगर' या हिंदी-तेलुगू चित्रपटातील गुंतवणुकीच्या स्रोताबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता.
काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न
काँग्रेस नेते बक्का जडसन यांनी चित्रपटातील संशयास्पद गुंतवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर ईडीने तपास सुरू केला होता. या चित्रपटात राजकारण्यांनीही पैसे गुंतवले असल्याचे जडसन सांगतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना काळा पैसा पांढरा करणे सोपे झाले असा त्यांचा दावा आहे.
‘फेमा’चे उल्लंघन करून परदेशातून चित्रपट बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये गुंतवले गेल्याच्या आरोपाबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिग्दर्शक आणि निर्मात्याची चौकशी केल्याचे सांगितले जात आहे.
पेमेंट कसे केले
अनेक कंपन्यांनी चित्रपट निर्मात्यांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. आता ज्या निर्मात्यांनी पैसे गुंतवले आहेत आणि परदेशी अभिनेते माईक टायसन आणि तांत्रिक क्रू यांना पैसे कसे दिले आहेत त्यांच्याकडून तपशील मागवला आहे.