‘स्वयंपूर्ण गोवा’तून विकासासह रोजगारही!

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा राज्य सरकारचे कौतुक; विकासासाठी हजारो कोटी​ दिल्याचाही दावा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th November 2022, 11:50 pm
‘स्वयंपूर्ण गोवा’तून विकासासह रोजगारही!

पणजी : गोव्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत हजारो कोटींचा निधी दिलेला आहे. गोवा सरकारने सुरू केलेली ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम मानवी, पायाभूत विकासासह रोजगारालाही चालना देत आहे, असे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केले.
राज्य सरकारच्या पोलीस, अग्निशामक, नियोजन आणि सांख्यिकी, नदी परिवहन आणि कृषी या खात्यांत नोकऱ्या मिळवलेल्या १,२५० जणांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यासाठी गुरुवारी दोनापावला येथे राजभवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी गोमंतकीयांशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री बाबूश मोन्सेरात, सुभाष फळदेसाई, सुभाष शिरोडकर, नीलेश काब्राल, मुख्य सचिव पीयुष कुमार गोयल, आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
केंद्रात आणि गोव्यात भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार आहे. त्यामुळे दोन्ही सरकारांकडून गोव्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचे ध्येय ठेवून काम सुरू आहे. गेल्या आठ वर्षांच्या काळात केंद्राकडून मिळालेल्या निधीच्या आधारे गोवा सरकारने विविध पायाभूत प्रकल्प सुरू केले आहेत. सुमारे तीन हजार कोटी खर्चून बांधलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार आहे. या प्रकल्पात गोव्यातील हजारो स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याशिवाय लवकरच कार्यान्वित होणाऱ्या इतर प्रकल्पांतही स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होणार आहेत. पर्यटन मास्टर प्लान आणि धोरण तयार करून गोवा सरकारने पर्यटन व्यवसायालाही चालना देण्याचा आराखडा सरकारने तयार केलेला आहे. त्यामुळे गोवा येणाऱ्या काही वर्षांत विकासाची​ अनेक शिखरे पादाक्रांत करेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सरकारकडून स्वयंरोजगाराला चालना

ग्रामीण भागांचा आर्थिक विकास साधण्यासाठी आणि पारंपरिक शेतीला चालना देऊन त्यातून स्वयंरोजगारासाठी गोवा सरकारकडून विविध मार्गांनी प्रोत्साहन दिले जात आहेत. धान्य, अन्न प्रक्रिया, ज्यूट, नारळ आदींमध्ये कार्यरत शेतकऱ्यांना स्वयंसहाय्य गटांशी जोडून स्वयंरोजगाराला मोठ्या प्रमाणातत चालनाही दिली जात आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

भरतीमुळे सरकारी खाती अधिक सक्षम

गोवा सरकारने रोजगार मेळ्याच्या माध्यमातून विविध सरकारी खात्यांत युवक-युवतींची भरती करीत सरकारी खात्यांना बळकटी दिलेली आहे. त्यामुळे सरकारी खात्यांमधून स्थानिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार आहेत. या मेळ्यात नियुक्तीपत्रे मिळालेल्यांनी २०४७ च्या नव्या भारताचे ध्येय ठेवून राज्याला आणि देशाचा विकास साधावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

हेही वाचा