दोन पंचांनी साक्ष फिरवल्याने हेमंत शहाची निर्दोष मुक्तता

सुशांतसिंग मृत्यू प्रकरणातील ड्रग्जशी होता संबंध

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th November 2022, 11:43 Hrs
दोन पंचांनी साक्ष फिरवल्याने हेमंत शहाची निर्दोष मुक्तता

पणजी : ड्रग्ज तस्करी प्रकरणातील दोन पंचांनी साक्ष फिरवल्यामुळे अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यूशी निगडित ड्रग्ज प्रकरणात सहभाग असलेल्या आणि गोव्यात दुसऱ्या गुन्ह्यात अटक केलेल्या हेमंत उर्फ महाराज शहा याला उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
मुंबई एनसीबीने सुशांतसिंग मृत्यूशी निगडित ड्रग्ज तस्करी प्रकरणात अनुज केशवानी याला अटक केली होती. त्याला अमली पदार्थ पुरवणाऱ्या शहा याला एनसीबीने गोव्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने ७ मार्च २०२१ रोजी मोरजी येथील एका शॅकवरून ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याच्या मिरामार येथील फ्लॅटाची झडती घेतली असता, ०.२३ ग्रॅम एलएसडीचे १५ ब्लॉट आणि ३० ग्रॅम चरस सापडले होते. याप्रकरणी अटक केल्यानंतर त्याला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता.
दरम्यान, एनसीबीच्या गोवा विभागाने वरील प्रकरणात शहाविरोधात न्यायालयात २८ ऑगस्ट २०२१ रोजी ७० पानी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात सात जणांची साक्ष नोंदवली होती. यातील शहा याच्यासोबत मिरामार येथील फ्लॅटमध्ये राहणारा आणि आणखी एका व्यक्तीला पंच साक्षीदार केले होते. त्या दोघांनी न्यायालयात साक्ष फिरविली आहे. या कारणाने न्यायालयाने शहाची निर्दोष सुटका केली.