कांतारा सुपरस्टार ऋषभ शेट्टी महागड्या कार्सचा चाहता


17th November 2022, 09:19 pm
कांतारा सुपरस्टार ऋषभ शेट्टी महागड्या कार्सचा चाहता

ऋषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट कांतारा देशभरात बॉक्स ऑफिसवर नव नवे विक्रम करत आहे आणि प्रचंड कमाई करत आहे. आयएमडीबीवर ९.४ रेटिंग मिळाल्यानंतर चित्रपटाने अॅक्शन थ्रिलर केजीएफ आणि आरआरआर यांनाही मागे टाकले आहे. चला तर जाणून घेऊया ऋषभ शेट्टीची एकूण संपत्ती.
ऋषभ शेट्टीच्या कांतारा चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सगळेच ऋषभ शेट्टीच्या टॅलेंटचे चाहते झाले आहेत. कारण ऋषभने कन्नड भाषेतील अॅक्शन थ्रिलरमध्ये केवळ अभिनयच केला नाही तर तो त्याचा लेखकही आहे आणि त्यानेच त्याचे दिग्दर्शनही केले आहे. चित्रपटाच्या यशानंतर आता तो लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला असून इंटरनेटवर त्याला खूप सर्च केले जात आहे.
स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस
ऋषभ शेट्टी एक दशकाहून अधिक काळ कन्नड चित्रपटसृष्टीत आहे आणि त्याने स्वतःला दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून स्थापित केले आहे. तो २०१८ च्या सामाजिक-राजकीय चित्रपट ‘सरकारी हाय प्रा. शाले कासारगोडू, कोडुगे: रमन्ना राय’ चित्रपटापासून निर्माता बनला. ऋषभला अनेक पुरस्कार आणि प्रशंसा देखील मिळाली आहेत.
ऋषभ शेट्टीचे कार कलेक्शन
अनेक अभिनेत्यांप्रमाणेच ऋषभलाही आलिशान कारचा शौक आहे. अहवालानुसार, कन्नड अभिनेता-दिग्दर्शकाकडे ८३ लाख रुपयांची ऑडी क्यू-७ आहे जी त्याने या वर्षी त्याच्या महागड्या कारच्या ताफ्यात जोडली आहे. कांतारा रिलीजपूर्वी त्याची पत्नी प्रगती शेट्टीने इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे पोस्ट केली आणि ऑडी क्यू-७ बद्दल तपशील दिला. कारचा फोटो शेअर करत दिग्दर्शकाच्या पत्नीने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुमच्या समर्पण आणि मेहनतीचा नेहमीच अभिमान वाटतो. कुटुंबाला इतके प्रेम आणि सांत्वन दिल्याबद्दल ऋषभ शेट्टी फिल्मसचे आभार.
नाटकापासून कारकिर्दीला सुरुवात
ऋषभ शेट्टी हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी ऋषभने खूप मेहनत घेतली आहे. अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऋषभ शेट्टीने पहिल्यांदा थिएटर करायला सुरुवात केली. त्याने पहिले नाटक 'कुंदापुरा'मध्ये केले. यानंतर हळूहळू ऋषभला काही नाटकांमध्ये काम मिळू लागले. लोक ऋषभच्या अभिनयाचे खूप कौतुक करायचे. यामुळेच ऋषभची हिंमत वाढत गेली आणि त्याने अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. कॉलेजच्या दिवसांमध्ये ऋषभ शेट्टी स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी अभ्यासासोबतच विविध नोकऱ्याही करत असे.
यशासाठी १८ वर्षे मेहनत
यश मिळवण्यासाठी ऋषभने १८ वर्षे संघर्ष केला आहे. एकेकाळी त्याने पाण्याच्या बाटल्या विकल्या आणि रिअल इस्टेटच्या क्षेत्रातही काम केले. ऋषभ शेट्टीनेही काही काळ हॉटेलमध्ये काम केले. या कामांसोबतच ऋषभने चित्रपटांसाठीही प्रयत्न केले आणि २००४ मध्ये त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची पहिली संधी मिळाली. या चित्रपटातील त्याची भूमिका आणि व्यक्तिरेखा केवळ नावापुरतीच असली, तरी ऋषभने ती आनंदाने स्वीकारली आणि उत्कटतेने साकारली. त्याचप्रमाणे ऋषभ शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये अनामिक आणि किरकोळ व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
ऋषभ शेट्टीची एकूण संपत्ती
फार कमी लोकांना माहिती आहे की, ऋषभ शेट्टीने टीव्ही अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर २०१४ मध्ये उलीदावरू कंदंते या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर आला. या स्टारने अभिनेता रक्षित शेट्टी स्टारर ‘रिकी’साठी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. आता कांताराच्या नुकत्याच मिळालेल्या यशामुळे शेट्टीच्या संपत्तीत आणखी एका शून्याची भर पडली आहे. एका अहवालानुसार, शेट्टीची एकूण संपत्ती १२ कोटी २४ लाख रुपये आहे.