आताच्या काळात डिजिटल माध्यम प्रभावी अन् सर्वांच्या सोयीचे

विनायक गायकवाड : प्रुडंट मीडियाच्या सोळाव्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रुडंट प्लस अॅप, पॉडकास्टचा शुभारंभ


03rd October 2022, 12:37 am
आताच्या काळात डिजिटल माध्यम प्रभावी अन् सर्वांच्या सोयीचे

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : प्रसारमाध्यमांत आता नवनवे बदल होत आहेत. डिजिटल माध्यमही बदलत आहे. डिजिटल हे प्रभावी आणि सोयीचे माध्यम आहे. डिजिटल माध्यमात नवनवे प्रयोग करत प्रुडंट अधिकाधिक लोकांपर्यंत पाेहोचेल, असा विश्वास बीबीसी मराठीचे संपादक विनायक गायकवाड यांनी व्यक्त केला. प्रुडंट मीडियाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी ते बोलत होते.            

सांतिनेज येथील काकुलो मॉलच्या सभागृहात सकाळी ११ वा. हा कार्यक्रम सुरू झाला. व्यासपीठावर फोमेंतो समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अंबर तिंबलो, संचालक ज्यो लुईस, प्रुडंट वाहिनीचे संपादक प्रमोद आचार्य उपस्थित होते. प्रुडंट मीडियात दहा वर्षांहून अधिक काळ सेवा केलेले कर्मचारी व पत्रकार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात प्रुडंट प्लस या अॅपचे आणि प्रुडंट पॉडकास्ट यांचा शुभारंभ करण्यात आला.            

विनायक गायकवाड डिजिटल माध्यमाविषयी म्हणाले, डिजीटल याचा नेमका अर्थ कोणालाच सांगता येणार नाही. डिजिटल माध्यमांत वेगाने बदल होत आहेत. नवनवे प्रयोग केले जात आहेत. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणारे हे माध्यम आहे. प्रुडंट हे गोव्याचे नंबर एक चॅनेल असल्यामुळे डिजिटल माध्यमांतही त्याचा लाभ होईल. डिजिटल माध्यमांत सतत प्रयोग करावे लागतात. सुरुवातीला यश हाती लागले नाही तरी प्रयोग सुरूच ठेवा. वेळ लागले पण यश निश्चित मिळेल. 

स्वानुभव कथन करताना गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दूरचित्रवाहिन्यांची संख्या वाढत आहे. दैनिकांची संख्याही वाढत आहे. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या आपण डिजिटल झाल्याचा दावा करतात; परंतु ते त्यांच्या दैनिकात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्याच संकेतस्थळावर टाकतात. ज्या बातम्या दूरचित्रवाहिन्या प्रसारित करतात, त्यांचेच क्लीप काढून वेबसाईटवर ठेवल्या जातात. याला डिजिटल माध्यम म्हणत नाहीत. डिजिटल माध्यम हे एक स्वतंत्र माध्यम आहे. यात विविध प्रयोग करण्याच्या संधी असतात. फोमेंतो समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अंबर तिंबलो म्हणाले की, दिवसेंदिवस प्रसारमाध्यमांची जबाबदारी वाढत आहे. माहिती हे आता चलन होऊ लागले आहे. प्रुडंट वाहिनी वेगवेगळे प्रयोग करून अधिक प्रभावी बनत आहे. जनतेचा विश्वास तिने संपादन केला आहे.

कार्यक्रमात संचालक ज्यो लुईस यांनी प्रास्ताविक केले. प्रुडंट मीडिया स्वतंत्र, विश्वसनीय, अचूक, संवेदनशील आणि जबाबदार माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. संपादक प्रमोद आचार्य यांनी प्रुडंट वाहिनीने राबवलेल्या उपक्रमांचा आढावा मांडला. सुयश गावणेकर यांनी आभार मानले.

बीबीसी ही जुनी संस्था आहे. डिजिटल मराठीमध्ये आम्ही नवनवे प्रयोग करत असतो. डिजीटल माध्यमांत केल्या जाणाऱ्या प्रयोगांत सातत्य असण्याची गरज आहे. सातत्य राहिले तरच विश्वासार्हता निर्माण होते. डिजिटल माध्यमाचा वापर करून आपला प्रभाव वाढवण्याची संधी प्रुडंट मीडियाला आहे.

— विनायक गायकवाड, संपादक, बीबीसी मराठी

हेही वाचा