लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६५.४ टक्के मतदान

१,२०२ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद


27th April, 12:07 am
लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६५.४ टक्के मतदान

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी‌ दिल्ली : आठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ जागांवर मतदान झाले. त्रिपुरामध्ये सर्वाधिक ७७.९३ टक्के मतदान झाले. महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वांत कमी ५३ टक्के मतदान झाले. सरासरी ६५.४ टक्के मतदान झाले
उखरुल, मणिपूर येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही संशयित एका बूथमध्ये घुसले. काँग्रेसने या घटनेवर लोकशाहीचे अपहरण केल्याचा आरोप केला. याआधी छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यात बूथ ड्युटीवर असताना एका पोलिसाने स्वत:वर गोळी झाडली. तो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. बंगालमधील बलुरघाट आणि रायगंज येथे केंद्रीय दले महिलांना मतदान करण्यापासून रोखत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये बालूरघाटात हाणामारीही झाली.
दुसऱ्या टप्प्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, ५ केंद्रीय मंत्री, २ माजी मुख्यमंत्री आणि ३ चित्रपट तारे यांच्यासह राहुल गांधी, शशी थरूर आणि हेमा मालिनी यांच्या जागांवरही मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या टप्प्यात १,२०२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये १,०९८ पुरुष आणि १०२ महिला उमेदवार आहेत. दोन उमेदवार तृतीयपंथी आहेत. यापूर्वी १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान झाले होते. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

हेही वाचा