ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd October 2022, 12:37 Hrs
ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक

म्हापसा : कळंगुट पोलिसांनी ड्रग्ज ओव्हरडोस प्रकरणी देवीनेनी त्रीलोक चौधरी या आंध्रप्रदेश मधील युवकाला कोकेनचा पुरवठा करणारा संशयित प्रथमेश पालयेकर (२८, रा. मांगोरहील - वास्को) या संशयित टॅक्सी चालकाला अटक केली आहे. गेल्या २८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मुख्य ड्रग्ज पुरवठादारालाही अटक होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संशयित देवीनेनी चौधरी याच्यासह चौघांचा गट गोव्यात हैदराबाद आंध्रप्रदेशमधून पर्यटनासाठी आला होता. दाबोळी विमानतळावरून पर्यटक टॅक्सी कारने ते कळंगुटमध्ये आले व एका हॉटेलमध्ये उतरले होते. वाटेत येताना संशयित पर्यटकाला पर्यटक टॅक्सी कारचालकाने एक ग्रॅम कोकेनचा पुरवठा केला होता.

या ड्रग्जचे सेवन केल्यानंतर चौधरी याला या ड्रग्जचे अतिसेवन झाले व त्याची तब्येत बिघडल्याने त्यास उपचारार्थ गोमेकॉमध्ये दाखल केले होते. त्याला डिस्चार्ज देण्यापूर्वी तेथे त्याची दंडाधिकाऱ्यांनी जबानी घेतली. त्यात त्याने आपल्याला पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट डिझायर पर्यटक टॅक्सी गाडीच्या चालकाने ड्रग्जचा पुरवठा केला होता व सदर ड्रग्समुळे तब्येत बिघडल्याची कबुली दिली होती.

दंडाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल कळंगुट पोलिसांना सादर केला. त्यानुसार पोलिसांनी ड्रग्जचे सेवन केल्याबद्दल वरील युवक व ड्रग्जचा पुरवठा केल्याप्रकरणी अज्ञात पर्यटक टॅक्सी चालकावर गुन्हा नोंद केला होता.

या गुन्ह्याची चौकशी करून पोलिसांनी रविवारी दि. २ ऑक्टोबर रोजी सदर स्विफ्ट कारसह संशयित टॅक्सी चालकाचा शोध लावला व पकडून वरील गुन्ह्यात त्यास अटक केली. संशयित आरोपीने आपण पर्यटकांना ड्रग्जचा पुरवठा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या टॅक्सी चालकाला ड्रग्ज दिलेल्या मुख्य पुरवठादाराची ओळख पटवली असून त्यालाही लवकरच पकडण्यात येण्याची शक्यता आहे.

कळंगुट पोलिसांसमोर राज्यातील ड्रग्जचे पहिलेच अतिसेवन प्रकरण नोंद करून त्याचा यशस्वीरित्या छडा लावणे हे एक आव्हानात्मक काम होते. पण पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक किरण नाईक, हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉ. गणपत तिळोजी, अमीर गरड, आकाश नाईक व संज्योत केरकर या पथकाने पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना व उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली.