विदेशात नोकरी लावण्याच्या नावे घेतलेल्या रकमेसाठी अपहरण

चार जणांना अटक, पणजी पोलिसांची कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd October 2022, 12:14 am
विदेशात नोकरी लावण्याच्या नावे घेतलेल्या रकमेसाठी अपहरण

म्हापसा : विदेशात नोकरी लावण्यासाठी घेतलेले रूपये वसूल करण्यासाठी फिर्यादी इसमाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली पणजी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.

अटक केलेल्यांमध्ये संशयित ऑस्टीन अ‍ॅन्थनी लोरून्को (२९, रा. सेंट. अ‍ॅन्थनीवाडा गिरी), साईश अनिल पार्सेकर (२५, रा. माय दे देवूस वाडा सांगोल्डा), रशीद इक्बाल शेख (२५, रा. शेळपे म्हापसा) यांच्यासह टॅक्सीचालक विनोद जगन्नाथ गायकवाड (४०, रा. इंदिरानगर चिंबल) यांचा समावेश आहे.

फिर्यादी आर्थुर आलेक्सो लॉरेन्सो (५०, रा. हळदोणा) यांनी वरील संशयितांसह इतरांकडून विदेशात नोकरी देण्याचे सांगून १५ लाख रूपये घेतले होते. नोकरी न मिळाल्याने तसेच दिलेली रक्कमही परत केली जात नसल्यामुळे संशयितांनी फिर्यादींकडून हे रूपये वसूल करण्यासाठी दि. २८ सप्टेंबर रोजी त्यांचे दोनापावला पणजी येथून अपहरण केले.

तेथून त्यांना मारझोड करून वेगवेगळ्या जागी नेले व त्यांच्याकडून धमकी देऊन काही रूपये वसूल केले. नंतर त्यांना हणजूण येथे कोंडून ठेवण्यात आले. हणजूण पोलिसांनी फिर्यादीची सुटका केली व हे प्रकरण पणजी पोलिसांकडे वर्ग केले.

त्यानंतर पोलिसांनी शनिवारी चारही संशयितांनी पकडले व भा.दं.सं.च्या ३४२, ३६३, ३२६, ३८४, ३२३, ५०६ (२) व ३४ कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक केली. या प्रकरणात अजून काहींचा हात असून त्या संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

हेही वाचा