मनाचे सीमोल्लंघन

विजया दशमी अर्थात दसरा हा सण संपूर्ण भारतभरात साजरा केला जातो. साडे तीन मुहूर्तातील एक असल्यामुळे या शुभदिनी गोडाधोडाचं खाण्याची, सोनंनाणं खरेदी करण्याची परंपरा आहे. दसर्‍याशी निगडित अनेक पौराणिक कथा आहेत. या दिवशी सीमोल्लंघनाचीही परंपरा आहे. इतिहास काळात या सीमोल्लंघनाचे संदर्भ वेगळे होते. आता बदलत्या काळात त्याचा नव्यानं विचार करायला हवा. आपल्या आयुष्यातल्या दु:खद नकोशा वाटणार्‍या मनःस्ताप देणार्‍या गोष्टी मनाच्या सीमापार करून, मन करा रे सशक्त असा नवीन मूलमंत्र जपत या दसर्‍याला नवीन पद्धतीने मनाचे सीमोल्लंघन करावं. भीती, राग, ईर्षा, मत्सर, अहंकार सगळे मनाचे शत्रु आहेत. त्यांचे निदार्लन करून सीमोल्लंघन करीत नव्या विचारांना आनंदाने सामोरे जावूया.

Story: वेध | अरूणा सरनाईक |
01st October 2022, 10:41 Hrs
मनाचे सीमोल्लंघन

सध्याचे दिवस सणवारांनी भरगच्च भरलेले आहेत. वर्षातले हे चार महिने अधिकच व्यस्त असतात. तसे पाहता ३६५ दिवसांच्या प्रत्येक दिवसाला एक ठरावीक महत्त्व आहे. मुळातच आपण उत्सवप्रिय आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने भारतात सर्व सणवार- उत्सव साजरे केले जातात. गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आलेल्या नवरात्रोत्सवाचा आनंदोत्सव सध्या सुरू आहे. याची सांगता दसर्‍याने होईल. विजयादशमी म्हणून ओळखला जाणारा दसरा संपूर्ण भारतभरात परंपरेनुसार चालत आलेल्या पद्धतीने साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या नवरात्राची सुरूवात होते. नवमी हा नवरात्राचा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन साडेतीन हजार वर्षांपासून देवीचे नवरात्र केले जाते, असे संदर्भ आढळतात. मात्र त्यापूर्वीही म्हणजे महाभारत- रामायण काळातही दसरा या सणाचा उल्लेख दिसून येतो. रावणवध हा दसर्‍यालाच केला गेला असे म्हणतात. त्या परंपरेनुसार आजही दसर्‍याला रावणदहन केले जाते. शिवाय पांडवांचा अज्ञातवास देखील याच दिवशी संपला. शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवलेली आपली शस्त्रे पांडवांनी याच दिवशी पुनःश्च धारण केल्याची कथा आहे. अशा विविध पौराणिक कथा या दिवसाला जोडल्या गेल्या आहे. देवीने देखील नऊ दिवस युद्ध करून दशमीला म्हणजे दसर्‍याला महिषासुराचा वध केला. अशा विविध कारणांनी या दिवसाचे महत्त्व अधिकत्त्वाने आहे. शिवाय साडे तीन मुहूर्तातला एक पूर्ण मुहूर्त म्हणूनही हा दिवस महत्त्वाचा आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात या दिवसापासून केल्यास कार्य सिद्धीस जाते आणि उत्तम फलप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. 

या दिवशी सीमोल्लंंघन करण्याचीही परंपरा आहे. यामागील प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. महाराजांच्या काळात दसर्‍यानंतर स्वारीवर निघण्याची परंपरा होती. या सीमोल्लंंघनाचा अर्थ असा की, या दिवसानंतर महाराज स्वारीवर निघत असत. कारण पावसाळा संपलेला असे. दिवस हळूहळू लहान होत जातो आणि रात्र मोठी असते. पावसाळी नभ जावून आकाश निरभ्र झालेले असतेे, शत्रु देखील खावून पिवून सुस्तावलेला असतो, या सर्व नैसर्गिक वातारवणाचा अनुकूल फायदा घेत महाराज शत्रूवर स्वारी करायचे आणि आपल्या अतुल्य शौर्याने विजय मिळवायचे. या लढाईत मिळालेली लूट देवीला अर्पण करून त्याचा उपयोग स्वराज्यासाठी केला जायचा. हा सीमोल्लंघनाचा अर्थ. सीमा पार करून शत्रुचा पराभव करणे. स्वराज्याची वाढ करणे. लोकहिताची काम करणे, असे स्वरूप होते सीमोल्लंघनाचे! आजही ते प्रतिकात्मकरित्या केले जाते. प्रथा म्हणून लोक देवाला जावून शमीची पाने सोनं म्हणून लुटून आणतात आणि एकमेकांना देतात. यथोचित नमस्कार, आशीर्वादाची देवाणघेवाण करतात. महाराष्ट्रात नवीन जावयाला खरं सोनं देण्याची पद्धत अगदी कालपरवापर्यंत होती. आता परिस्थिती बदलली आहे. सोन्याचे भावही आता सामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. तरीही विशेषप्रसंगी सोनं खरेदी केलं जातच. यामागे परंपरा जपणं हा भाव जास्त आहे. 

आज प्रत्येक धर्मात आपापले सणवार किंवा महत्त्वाचे दिवस आवर्जून साजरे केले जातात. सण म्हणून तो तसा पाळावा देखील. कारण पुढील पिढीला त्या सणांची माहिती होणे गरजेचे आहे. त्यातून परंपरा अखंडित राहण्यास मदत होते. 

आज मात्र सीमोल्लंघन कसे करावे, याबाबत मनात मात्र काही वेगळे आहे. गेल्या दोन वर्षांत करोनाने सर्वांंना त्रास झाला. मनाचे खच्चीकरण झाले. भीतीने मनाला पूर्ण ग्रासून टाकले होते. शिवाय बदलत्या जगात, सिमेंटच्या युगात पूर्वीसारखे काहीच राहिलेले नाही. अशावेळी गावाची सीमा ओलांडून परत आल्यावर तांदुळाचा रावणवध करणे, घरातील मोठ्या वयाच्या आईकडून, बायकोकडून औक्षण करून घेणे हे सारे कितपत योग्य वाटते? एक प्रथा म्हणून निश्चितच योग्य. मात्र नवा विचार आपण करून शकतो का? हा विचार किंवा प्रश्न ऐरणीचा निश्चितच आहे. त्यापेक्षा मनाचे सीमोल्लंघन करूया. बंदिस्त जखडलेल्या मनाच्या आपणच घातलेल्या सीमारेखा ओलांडू या! सिमा ओलांडून जाता येतं. बाहेर पडता येतं. मग अशा मनाच्या सिमारेखा ओलांडता येतील का? मनाची सर्व दारं खिडक्या ओलांडता येतील का? आज जागोजागी प्रत्येक वेळी मनाची अडवणूक केली जाते! मन मारलं जातं! मनाचं मनाशीच युद्ध सुरू असतं ना? ही मनाची लढाई होणार, जखमी मनाची वाताहत होणार हे निश्चितच टाळता येईल का? मनोरूग्णांची वाढती संख्या, समुपदेशकांचे वाढते प्रस्थ, जसं शरीराच्या दुखण्यासाठी आपण उपचार करतो तसाच उपचार मानसिक दुखण्यावर करणं केव्हाही योग्यच आहे. कारणं बरीच आहेत. आपली संवादाची कमतरता हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रमुख कारण असेल, असं माझं व्यक्तीश: मत आहे. 

एखाद्या व्हायरल प्रमाणे हे मानसिक रोग वाढू लागले आहेत. भावनाशील मनं, मुलाचं परदेशी जाणं, स्त्रियांच्या बाबतीत आधीच्या आयुष्यातील अपमान, रजोनिवृत्ती अशी अनेक कारणं आहेत. पूर्वी देखील असंच असायचं. घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती समुपदेशकाचे काम करीत असे. मन मोकळं करायला जागा होती. नदीचे पाणवठे ही तर स्त्रियांची खास जागा असायची. एकमेकांची सुखदु:खे वाटली  जायची. मनं मोकळी व्हायची. आजही नव्यानं विचार करायला लावणारी ही सीमोल्लंघनाची कल्पना खरंच अशा विचारांनी व्यवहारात यावी. मनाच्या कक्षा भिंती रूंद करा. त्यांना कक्षेत बांधून ठेवू नका. पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची आठवण येतेय. त्यांनी मनातल्या सर्व विचारांना, भावभावनांना मनाच्या सीमापार केलेलं असावंं. देश सुखी व्हावा हीच एक सर्वव्यापी भावना त्यांच्या जीवनाचे प्रमुख ध्येय होते. त्यालाच त्यांनी प्रधान्य दिले. आपल्या आयुष्यातल्या दु:खद, नकोशा वाटणार्‍या मनःस्ताप देणार्‍या गोष्टी मनाच्या सीमापार करून, मन करा रे सशक्त असा नवीन मूलमंत्र जपत या दसर्‍याला नवीन पद्धतीने मनाचे सीमोल्लंघन करावं. भीती, राग, ईर्षा, मत्सर, अहंकार सगळे मनाचे शत्रु आहेत. त्यांचे निदार्लन करून सीमोल्लंघन करीत नव्या विचारांना आनंदाने समोरे जावूया.

 दसर्‍याच्या, विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा!