ड्रग्ज तस्करी : कांदोळीत दोघांना अटक

न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी


28th September 2022, 11:38 pm
ड्रग्ज तस्करी : कांदोळीत दोघांना अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने मंगळवारी मध्यरात्री सायपे-कांदोळी येथील हाॅटेल हिल्टनजवळ छापा मारून सिग्मंड टेलिस (२१, सायपे-कांदोळी) आणि अक्षय बाणावलीकर (२६, रा. गौरववाडो-कळंगुट) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ ग्रॅम १० अॅक्टसी टॅब्लेटस आणि ५ ग्रॅम एमडीएमए, २ मोबाईल, एक दुचाकी मिळून ३.५ लाख रुपयांचा एेवज जप्त केला आहे.       

गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सायपे-कांदोळी येथे एक युवक अमलीपदार्थ तस्करीत सहभागी असून, तो तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार, गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन आणि अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेथन आल्मेदा, काॅन्स्टेबल सैफुल्ला मकानदार, गौरेश वायंगणकर, स्वप्नील सिमेपुरुषकर, गौरव नाईक, धीरज देविदास व इतर पथकाने मंगळवारी मध्यरात्री ११.२५ ते बुधवारी पहाटे ३.०५ दरम्यान सायपे-कांदोळी येथील हाॅटेल हिल्टनजवळ सापळा रचला. एक दुचाकीवरून दोन युवक अाले असता त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडून पथकाने ५ ग्रॅम १० अॅक्टसी टॅब्लेटस आणि ५ ग्रॅम एमडीएमए, २ मोबाईल, एक दुचाकी मिळून ३.५ लाख रुपयांचा एेवज जप्त केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक मंगेश वळवईकर यांनी दोघा संशयितांविरोधात अमलीपदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. बुधवारी दोघा संशयितांना म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.