महाराष्ट्रात खातेवाटप जाहीर; तिजोरीच्या चाव्या फडणवीसांकडे

१८ मंत्र्यांना खाती, शिंदेंकडे सर्वात जास्त खाती; महत्त्वाची खाती भाजपकडे


14th August 2022, 11:52 pm
महाराष्ट्रात खातेवाटप जाहीर; तिजोरीच्या चाव्या फडणवीसांकडे

मुंबई : महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारमधील १८ मंत्र्यांना अखेर खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपात भाजपाला महसूल, उच्च व तंत्रशिक्षण अशी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असणार आहेत. त्यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती असतील.

महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये भाजपाचे ९ आणि शिंदे गटातील ९ अशा एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अद्याप हे सर्व नेते कोणत्याही खात्याविना मंत्री होते. असे असताना रविवारी या मंत्र्यांना खातेवाटप झाले आहे. यामध्ये, महत्त्वाची खाती भाजपाला देण्यात आली आहेत. यातही सर्व महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवली आहेत. त्यांच्याकडे वित्त व नियोजन, गृहखाते, गृहनिर्माण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी एकूण ८ खाती आहेत.

एकनाथ शिंदेंकडे १४ खाती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे एकूण १४ खाती ठेवली आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग अशी एकूण १४ खाती शिंदे यांच्याकडे आहेत.

इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास

गिरीष महाजन : ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे : बंदरे व खनिकर्म

संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे : कामगार

संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत : उद्योग

प्रा.तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार : कृषी

दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.