राष्ट्रपती पदकप्राप्त प्रशांत धारगळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th August 2022, 11:50 Hrs
राष्ट्रपती पदकप्राप्त प्रशांत धारगळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पेडणे : पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झाले. पेडणे तालुक्यातून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

मालपे पेडणे येथील प्रशांत धारगळकर यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. प्रशांत यांनी क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ कामगिरी बजावलेली आहे. १९८८ साली ते अग्निशमन दलात रुजू झाले. नवीन कबड्डीपटू तयार व्हावेत यासाठी तालुका व राज्य पातळीवर कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचा हातखंडा आहे. दहावीत शिकत असताना त्यांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत गोव्याच्या संघातून सहभाग दर्शवला आणि यश खेचून आणले. गोव्याच्या संघाचे त्यांनी अनेक वेळा कर्णधारपद सांभाळले. १९८६ ते २००५ दरम्यान ते खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होते.

६ मार्च २००६ रोजी माशेल येथे सुमारे ६० ते ७० फुट खोल परंतु वापरात नसलेल्या विहिरीत आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एका मुलीने उडी मारली होती. त्यावेळी धारगळकर जुने गोवा कार्यालयात होते. त्यावेळी ते विहिरीत उतरले, त्यांना विहिरीतील कोब्रा नागाचा सामना करावा लागला. चार तासाच्या झुंजीनंतर प्रशांत यांनी त्या मुलीचा जीव वाचवला. याची सरकारने दखल घेत २००६ साली त्यांचा गौरव केला. सतत दुसऱ्यांना मदत करण्यात ते नेहमी पुढे असतात. आपल्या कार्यात आपली बहिण अनुराधा शिरोडकर, भावोजी अनिल शिरोडकर, भाऊ प्रेमनाथ धारगळकर व पत्नी यांचे नेहमी सहकार्य मिळत असल्याचे ते सांगतात.