बायोमिथेनेशन प्रकल्प राहणार सुरू

मडगाव पालिकेकडून पैसे अदा

|
14th August 2022, 11:35 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
मडगाव पालिकेकडून बायोमिथेनेशन प्रकल्पाचे पैसे देण्यात आले नसल्याने कंपनीकडून १५ पासून प्रकल्प बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रकल्पाबाबतचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर मडगाव पालिकेकडूनही उर्वरित रक्कम कंपनीला अदा करण्यात आली. त्यामुळे बायोमिथेनेशन प्रकल्प यापुढेही सुरूच राहणार आहे.
मडगाव येथे एसजीपीडीए मार्केटनजीक पहिल्या ५ टीपीडी बायोमिथेनेशन प्रकल्पाचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले होते. या प्रकल्पावर दोन कोटी ४० लाखांचा खर्च करण्यात आलेला असून ऊर्जा बायोसिस्टिम प्रा. लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सदरचा बायोगॅस प्रकल्प हाताळला जात आहे. यासाठी दरमहिना पालिकेकडून सदर कंपनीला पैसे अदा करावे लागत आहेत.
या प्रकल्पाच्या उभारणीपासून आतापर्यंत ठरलेल्या रकमेच्या ६० टक्के रक्कम पालिकेकडून अदा करण्यात आलेली आहे. मात्र, उर्वरित ४० टक्के रक्कम ७१ लाख ५१ हजार एवढी बाकी आहे. याशिवाय सहा महिने प्रकल्प चालवणे व देखभाल दुरुस्तीचे ११ लाख २० हजार रुपये रक्कमही पालिकेकडून मिळालेली नाही. एकूण सुमारे ८२ लाख ७२ हजारांची रक्कम पालिकेकडून येणे बाकी होती. त्यामुळे पालिकेकडून ही रक्कम न मिळाल्यास कामगारांना पगार देणेही कठीण होणार असल्याचे सांगत कंपनीकडून पालिकेला १५ तारखेपासून प्रकल्प बंद करण्याची सूचना देण्यात आली होती.
दरम्यान, कंपनीकडून प्रकल्प बंद करण्याबाबत पत्र करण्यात आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बाकी असलेल्या प्रकल्पाबाबतचा अहवालही सादर करण्यात आला व पालिकेकडून कंपनीला उर्वरित पैसेही अदा करण्यात आले. त्यामुळे सध्यातरी या प्रकल्पाची हाताळणी ऊर्जा बायोसिस्टीम या कंपनीकडूनच होणार आहे.