साळगाव पोलिसांत अज्ञातांविरुद्ध खून, लुटमारीचा गुन्हा नोंद

माजी पोलीस उपनिरीक्षक मृत्यू प्रकरण

|
14th August 2022, 11:16 Hrsप्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
सालमोनावाडा-साळगाव येथे विष्णू धावस्कर (६६) या माजी पोलीस उपनिरीक्षक मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खून व लुटमारीचा गुन्हा नोंद केला आहे. गेल्या २४ व २५ जुलै दरम्यान हा प्रकार घडला होता.
साळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सालमोनावाडा-साळगाव येथे एका जुन्या पडिक घरात धावस्कर यांचा मृतदेह आढळून आला होता. मयत दि. २४ जुलै दुपारी १ पासून बेपत्ता होते. दुसर्‍या दिवशी २५ जुलै सायं. ६ वा. त्यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठवला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला होता. तर मृताचा व्हिसेरा पुढील विश्लेषणासाठी जतन करण्यात आला होता.
मयताच्या कुुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील अंगटी व १५ हजार रुपये रोकड आणि मोबाईल फोन मिळून दीड लाखांचा ऐवज गायब झाला होता. त्यामुळे लुटमारीच्या हेतूने आपल्या वडिलांची अज्ञातांनी हत्या केल्याचा दावा त्यांनी केला होता. मयताचा मुलगा प्रशांत धावस्कर यांनी या प्रकरणी साळगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या आधारे पोलिसांनी भा.दं.सं.च्या ३०२ (खून) व ३९२ (दरोडा) कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन लोकरे करत आहेत.