भारतीय क्रीडाक्षेत्राचा सुवर्णकाळ दार ठोठावत आहे : नरेंद्र मोदी

|
14th August 2022, 01:12 Hrs
भारतीय क्रीडाक्षेत्राचा सुवर्णकाळ दार ठोठावत आहे : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्मिंगहॅममध्ये २०२२ च्या राष्ट्रकुल खेळातून परतलेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानी भारतीय दलाला निमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी खेळाडूंना सांगितले की, भारतीय क्रीडाक्षेत्राचा सुवर्णकाळ दार ठोठावत असून आता चांगल्या कामगिरीवर समाधान मानून गप्प बसू नका.

खेळाडूंना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही सर्वजण तिथे स्पर्धा करत होता, परंतु वेळेच्या फरकामुळे भारतातील करोडो लोक रात्र जागवून तुम्हाला खेळताना पाहत होते. तुमच्या प्रत्येक कृतीवर रात्रभर देशवासीयांची नजर होती. खेळाप्रती ही आवड वाढवण्यात तुम्हा सर्वांचा मोठा वाटा आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात.

पंतप्रधान मोदी म्हणाले, जे खेळ आमचे सामर्थ्य आहेत त्यांना आम्ही बळकट करत आहोत. त्याचबरोबर नवनवीन खेळांमध्येही आपली छाप सोडत आहोत. हॉकीमधील आमचा वारसा आम्ही ज्या प्रकारे परत मिळवत आहोत त्याबद्दल मी आमच्या देशाच्या दोन्ही संघांच्या मेहनततीचे कौतुक करतो.

पंतप्रधान म्हणाले, गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी आम्हाला चार नवीन खेळांमध्ये जिंकण्याचा मार्ग सापडला आहे. लॉन बॉलपासून ते अॅथलेटिक्सपर्यंत अभूतपूर्व कामगिरी झाली. या गोष्टीमुळे तरुणांची नवीन खेळांची आवड वाढेल. त्याचप्रमाणे खेळातील कामगिरीत सुधारणा करत राहावे लागेल.

मोदी म्हणाले, ही तर सुरुवात असून समाधानाने बसण्याची गरज नाही. भारताच्या क्रीडाक्षेत्राचा सुवर्णकाळ दार ठोठावत आहे. आपले प्रयत्न अधिक तीव्र करावे लागतील. देशाची संपत्ती असल्याने कोणतीही प्रतिभा मागे राहू नये.

कुस्तीमध्ये भारताला सर्वाधिक पदके

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कुस्तीमध्ये सर्वाधिक पदके जिंकली. भारताने कुस्तीमध्ये एकूण १२ पदके जिंकली. यामध्ये ६ सुवर्ण, एक रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने १८व्यांदा या खेळांमध्ये प्रवेश केला. १०४ पुरुष आणि १०३ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतासाठी पुरुषांनी ३५ तर महिलांनी २६ पदके जिंकली. भारताला वेटलिफ्टिंगमध्ये १० पदके मिळाली. मीराबाई चानू, अचंता शेउली आणि जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्णपदक पटकावले. भारतीय बॉक्सर्सनी ७ पदके जिंकली. निखत जरीन आणि अमित पंघल यांनी सुवर्णपदक जिंकले.

खेळाडू नव्या भारताची भावना दाखवतात

यावेळी मोदींनी खेळाडूंना सांगितले की, जेव्हा अनुभवी शरथ (टेबल टेनिसपटू शरथ कमल) वर्चस्व गाजवतो आणि अविनाश साबळे, प्रियांका गोस्वामी आणि संदीप कुमार पहिल्यांदाच जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंशी सामना करतात, तेव्हा न्यू इंडियाची भावना निर्माण होते. प्रत्येक शर्यतीत, प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण सज्ज आहोत ही भावना महत्त्वाची आहे. भारतीय 

खेळाडूंना अॅथलेटिक्सच्या व्यासपीठावर दोन ठिकाणी उभे राहून तिरंग्याला सलामी देताना आपण किती वेळा पाहिले आहे.