नवगोमंतकाचे शिल्पकार भाऊसाहेब बांदोडकर

गोव्यात एकमेव बहुजन समाजाचा श्रेष्ठ नेता म्हणजे भाऊ हे होते. राजकारणात नुसती बुद्धिमत्ता काम देत नाही, तर मुत्सद्दीपणा, संवेदनशील मन व मौनही आवश्यक आहे. सडेतोडपणामुळे माणसे नाराज होतात; संयमही आवश्यक आहे, तो आमच्या भाऊत होता.

Story: विचारचक्र | जी. के. मणेर |
11th August 2022, 11:51 pm
नवगोमंतकाचे शिल्पकार भाऊसाहेब बांदोडकर

झाले बहू, आहेतही बहू, होतीलही बहू, परी या सम हेच आमचे वंदनीय भाऊसाहेब दयानंद बाळकृष्ण बांदोडकर. त्यांच्यासारख्या दुसरा अष्टगुणी, बहुपैलुप्राप्त पुढारी जन्माला आला नसावा. भाऊसाहेबांच्या मातापित्यांनी व गोतावळीतील अनुभवी ज्येष्ठांनी विचारांनी अन् एकमतांनी एखाद्या भविष्यवेत्या दृष्ट्याप्रमाणे त्यांचे ‘दयानंद’ असे सार्थ नाव ठेवले. त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात पेडणे येथे झाला. बालपणीच आईबापाचे छत्र गेले. त्यामुळे चुलत्याने त्यांना सांभाळले. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे इच्छा असतानाही उच्च शिक्षण ते पूर्ण करु शकले नाहीत. त्यांना नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसायात रुची होती. त्यांनी अनेक व्यवसाय हाताळले पण, अपुरे भांडवल असल्याने त्यांना शक्य झाले नाही.                   

खाण धंद्यात प्रवेश करण्यापूर्वी एखाद्या गोव्यातील डोंगरात रंग बनविण्याची योग्य अशी माती मिळेल काय याचा शोध घेतला. तरीही जिद्द पुरी करण्यासाठी रंग, रंगशेड, लाकुड वगैरे व्यवसायात थोडी मुशाफिरी केली. त्यांना शिकारीच्या छंद असल्याने गोमंतकातील पर्वत, जंगल, डोंगर भागांची इत्यंभूत माहिती होती. त्या अनुभवाचा त्यांना फायदा झाला. मग त्यांनी खाण धंद्यासाठी सरकारी परवाना घेऊन, वेळगे गोवा येथे मे. डी.बी. बांदोडकर अॅंड सन्स् नावाची खाण कंपनी प्रारंभ केली. सोबत गॅरेज व ऑफीस तसेच पणजी येथेही मोठे ऑफिस उघडले. या खाण धंद्यात त्यांनी चागले पाय रोवले. याशिवाय आपल्या मालाची निर्यात करण्यासाठी जुनी परवानायुक्त खाण कंपनी खरेदी करुन चांगला जम बसविला.                  

भाऊ साहेबांचा परिवार सौ. सुनंदाताई द. बांदोडकर, चार मुली शशिकला, उषा, क्रांती, ज्योती. नवसाने झालेला लाडका मुलगा, सिद्दार्थ. आपल्या परिवार सदस्यांना भाऊ उपदेश करीत. गीतेतल्या उक्तीप्रमाणे वागावे ! ‘कर्मण्ये वाधिका रस्ते माफलेतू कदाचन’. कर्म करीत रहावे, फलाची अपेक्षा करु नये. भाऊ पणजी ऑल्तिनोवरच्या भागात स्वत:च्या बंगल्यांत राहत होते. त्यांच्या सुकन्या सांगत, भाऊंची आदरयुक्त भीती सर्वांच्या मनात होती. आपल्या मागण्या ते पुरवित. ते कडक शिस्तीचे, अतिहसणे, खिदळणे त्यांना आवडत नसे. सडेतोडपणा, ताठपणा किंतू प्रेमळ स्वभाव. त्यांना लहान मुले अतिशय आवडत.                   

साडेचारशे वर्षानंतर भारतीय लष्करांच्या कारवाईने पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून १९ डिसेंबर, १९६१मध्ये ‘गोवा मुक्त’झाला. १९६३ मध्ये स्वतंत्र गोमंतकाची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. गोमंतकीय माणूस म्हाणजे एक अजब अवलिया, बेरकी, मुत्सद्दी आणि धूर्त व्यक्ती. ओपिनियन पोलमध्ये भाऊंच्या म.गो. पक्षाला सरळ विरोध दर्शविला, मात्र सार्वत्रिक निवडणुकीत म.गो. पक्षाला विजयी केले. नेहरू व इंदिरा गांधीजींच्या काँग्रेस पक्षाच्या एकाही उमेदवाराला निवडून आणले नाही. गोमंतकीय राजकीयदृष्ट्या निद्रिस्त नसून जागृत व अत्यंत बेरकी आहेत. हे अनेकांना आता ज्ञात झाले आहे. भाऊंना प्रसिद्धीची बिलकुल हाव नव्हती. भाऊ म्हणजे निष्कलंक चारित्र्याचा महामेरू मणी होता.                  

म.गो. पक्षाला दिलेली मदत ते पक्षासाठीच वापरत, देणाऱ्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी पुणे, मुंबईचे आपल्या मित्रांचे उद्योगधंदे विकत घेतले, ते त्यांना मदत म्हणून बँकांच्या कर्जासकट घेणे भाग पडले. भाऊसाहेबांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने महाराष्ट्रवादी गोमंतक संघटना स्थापन केली आणि प्रचंड यश मिळविले. स्थापित पक्षासाठी भाऊंनी आपल सर्वस्व तन, मन, धन अर्पित केले. गोमंतकाची संस्कृती महाराष्ट्राशी निगडीत आहे. गोवा स्वतंत्र झाल्यावर येथील सामाजिक व राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत गेली व नजीकच्या महाराष्ट्राबद्दल आपलेपणाची भावना अधिकच वाढली.  भाऊ भाग्यविधाते व गोमंतकाचे खंबीर आधारस्तंभ होते. त्यांनी स्वखर्चाने फर्मागुडी येथे ‘गणपती’चे मंदिर बांधले. गोव्याच्या गावड्या वांगडीपासून महाजनांपर्यंत सर्वांनी एक मुखाने ‘सबळ कौल दिला’ आमका भाऊंचे राज्य जाय! आणि गोमंतकात भाऊ दयानंदाचे राज्य आले. शिक्षण प्रसार हे भाऊंचे आवडते सामाजिक कार्य होते. चर्चेस, मंदिरांना, मशिदींना त्यांनी आर्थिक हातभार लावला आहे, ते निव्वळ उत्सवप्रिय नव्हते. त्यांच्या जीवनात धार्मिक पावित्र्याला स्थान होते. जरी ते हिंदू असले तरी सर्वधर्मी समानत्व भाव त्यांच्यात होता. ते विचाराने मानवतावादी होते आणि त्यांचे राजकीय नेवृत्व ही मानतावादी भूमिकेवर अवलंबून होते. भाऊ कवी ह्रदयी होते, असेही म्हणतात.                   

गोव्यात एकमेव बहुजन समाजाचा श्रेष्ठ नेता म्हणजे भाऊ हे होते. राजकारणात नुसती बुद्धिमत्ता काम देत नाही, तर मुत्सद्दीपणा, खोल मन व मौनही आवश्यक आहे. सडेतोडपणामुळे माणसे नाराज होतात, संयमही आवश्यक आहे, तो आमच्या भाऊत होता. खेडोपाडी शाळांचे जाळ विणलं गेलं. पोर्तुगीस काळात मराठी शिक्षणाची गळचेपी झाली होती. पण भाऊंनी खूप प्रयत्न करुन मराठी शिक्षण जिवंत ठेवलं आणि मराठी शिक्षणाची वृद्धी केली. पोर्तुगीज राजसतेच्या काळात मराठी शिकविणाऱ्यांना भाऊंनी आर्थिक मदत केली. राष्ट्रसेवा दलालाही त्यांनी मदत केली. मुख्यमंत्र्याला मिळणारा पगार त्यांनी रेडक्रॉसला दिला. व्यायाम शाळा, फुटबॉल, क्रिकेट मैदानांना भरभरुन आर्थिक सहाय्य केले. अनेक शाळांच्या इमारती बांधून दिल्या. काही शाळा स्वखर्चाने चालविल्या. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या. गोव्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. काहींची जेवणाची व राहण्याची सोयही केली. इतर राज्यांत, परदेशात जाऊन शिकणाऱ्यांनीही आर्थिक मदत केली. पणजीच्या मुष्टिफंड शाळेत त्यांनी स्वत: वर्गही घेतले. गणित व भाषा हे विषय त्यांनी चांगल्या प्रकारे शिकविले. त्यांनी आपल्या भगिरथ प्रयत्नांनी, अविश्रांत परिश्रमाने सामाजिक बांधिलकी समजून भरीव कार्य केले.                    

प्रत्येक खेड्यात वीज, उत्तम रस्ते, वाहतुकीची चांगली सोय केली. मोफत शालेय शिक्षणाची सोय केली. प्रत्येक खेड्यात सहकार्य पद्धतीने रेशन दुकानांची सोय केली. पणजी व बेती जोडणारा मांडवी पुल बांधला. मराठी सा‌हित्य संमेलने गोव्यात भरविली. भाऊंचा शब्द म्हणजे सोन्याचा शब्द होता. १९६३ साली ‘ज्ञान प्रबोधिनी’, पुणे शिक्षण संस्थेला पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली व त्या संस्थेचे ते उपाध्यक्ष झाले. ‘सामाजिक सुधारणा, सेवा युक्ती, शक्ती जेथे असते, तेथे मांगल्य नांदते! अस म्हणातात, हे भाऊंच्या सत्ताकाळात गोमंतकात घडले. रंकापासून ते रावांपर्यंत आपुलकीने वागल्याची प्रेमळ हातोटी, भाऊंची कौतुकास्पद होती. भुकेल्यांचा अन्नदाता, नंग्याचा वस्त्रदाता, अशिक्षितांना सुशिक्षित करणारार गुरु, त्यातच सुख समाधान पुण्य मागणारा शिक्षणप्रेमी, राजकारणापेक्षा राष्ट्रासाठी राबणारा, नैतिक मुल्यांना अधिक महत्त्व देणारा आमचा सहह्रदयी भाऊ, पोर्तुगीजांच्या कडक नजरेत राहून स्वातंत्र्यवीरांना व त्यांच्या गरजू नातेवाईकांना गुप्तपणे मदत करीत जीवन जगणारा भाऊ, गोव्यात काही समाजकंटकांनी भारताचे शत्रू देश, गोव्यावर हमला करतील अशी अफवा पसरविली होती. त्याची आपल्या जवळच्या मित्रांना घेऊन रात्री टेहळणी केली होती.                  

गोमंतकात भाऊपेक्षाही अनेक बडे श्रीमंत खाणमालक आहेत. उद्योगपती, गर्भश्रीमंत भाटकर होते व आहेत. भाऊंनी देवाने दिलेल्या अल्पधनाचा उपयोग जन कल्याणाकरिता ‘जन सेवा हीच खरी, ईश्वर सेवा’ मानून केला. भाऊ म्हणजे जनतेचे अनभिषिक्त राजेच होते. शहरातील मुलांची खेळण्याची सोय व्हावी म्हणून मांडवी किनारी बांदोडकर मैदान स्वखर्चाने बांधून दिला. क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांना दिलेली मदतही कौतुकास्पद होती.             

बोंडला फार्म आणि सरकारी कॅटल फार्म येथील आदिवासी भाऊंना देवाप्रमाणे मानत. विरोधकही भाऊंचा आदर करीत. म्हाळसादेवी हे त्यांचे कुलदैवत होते. उसाच्या उत्पादनाचा प्रयत्न, साखर कारखान्यांची निर्मिती, उद्योगधंद्याची वाढ हे त्यांचेच प्रयत्न होते. मुंबई ठाणे येथील नाईक-बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाला १९६८ साली तीन लाख वीस हजारांची भाऊंनी मदत केली. पुण्याच्या अनाथ महिलाश्रमाला आईच्या नावाने त्यांनी सढळ हस्ते मदत केली. त्यांची मातृभाषा कोकणी जरी असली तरी ते मराठीचे अभिमानी होते. गोव्यात जेवणाच्या एका ठेबलावर ग. दि. माडगुळकर, पं. महादेव शास्त्री जोशी, बा. द. सातोस्कर व भाऊ बसले अताना गप्पा सुरु असताना माडगुळकर म्हणाले, ‘भाऊ हा माणून म्हणजे कलियुगातील कर्ण आहे!’ डॉ. रघुनाथ पंडित म्हणायचे, भाऊसाहेब बहुगुणी एक असामान्य दाता आहे!’ एक लेखात वासुदेव केशव सावईकर म्हणतात ‘संत तुकडोजी महाराज हे भाऊ साहेबांचे पाहुणे होते!                  

लेखक च. वि. बावडेकर यांच्या बौद्धिक विचारानुसार व भाऊंच्या भल्या सामाजिक कार्यानुसार, भाऊ खरेच ‘A Stateman’ होते ‘A Politician’ नव्हते. ‘A Statesman’ ला आपण काहीतरी देशासाठी करावे, अशी इच्छा असते, तर ‘A Politician’ ची इच्छा देशाने आपल्यासाठी काही तरी करावे अशी असते. भाऊंनी १९६६-६७ या शैक्षणिक वर्षांत बाळकृष्ण बांदोडकर शिक्षण सोसायटीतर्फे वेळगे येथे केजी ते दहावीपर्यंत आईच्या नावे ‘श्रीमती हायस्कूल’, मुलाच्या नावे ‘सिद्धार्थ बांदोडकर हायर सेकंडरी स्कूल’ सुरू केले. या विद्यालयातसुद्धा हजारो विद्यार्थी विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत. भाऊंचा मृत्यू १२ ऑगस्ट, १९७३ रोजी पणजी येथे झाला. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वरील शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहतो.