मडगाव विभागातील कृषी क्षेत्रात दरवर्षी वाढ

तीन वर्षांची आकडेवारी : खरीप हंगामात यंदा आणखी २७.१०५ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

Story: अजय लाड |
05th August 2022, 11:38 Hrs
मडगाव विभागातील कृषी क्षेत्रात दरवर्षी वाढ

मडगाव : येथील कृषी विभागात गेल्या तीन वर्षांपासून लागवडीखाली येणाऱ्या कृषी क्षेत्रामध्ये दरवर्षी सरासरी २२ हेक्टरची वाढ होत आहे. २०२० साली ५,२०० हेक्टर असलेले कृषी क्षेत्र यंदा ५,२४७ हेक्टरपर्यंत वाढलेले आहे. यातून सासष्टीतील युवकांचा ओढा शेतीकडे वाढत असल्याचे यातून दिसते.
कोविड महामारीच्या कालावधीत अनेक युवकांनी कृषी क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिले व ते युवक मातीत उतरले. यांतील आजही अनेकजण शेती करून अन्य व्यवसाय सांभाळत आहेत. गेली दोन वर्षे म्हणजे कोविड काळात कृषी क्षेत्रात झालेली वाढ ही तात्पुरत्या स्वरूपातील राहील, असे मानले जात होते. मात्र, सासष्टी व मुरगाव तालुका त्याला अपवाद ठरला आहे. या तालुक्यांचा समावेश असलेल्या मडगाव कृषी विभागीय कार्यालयाकडील उपलब्ध माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे. मागील तीन वर्षांत सलग लागवडीखाली येत असलेल्या कृषी क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याचे या माहितीतून दिसून आलेले आहे. २०२० मध्ये सासष्टी विभागातील खरीप हंगामातील कृषी लागवडीखाली क्षेत्र हे ५,२०० हेक्टर एवढे होते. २०२१ या आर्थिक वर्षात लागवडीखालील क्षेत्रात सुमारे २० हेक्टर वाढ झाली. त्यामुळे गेल्यावर्षी ५,२२० हेक्टर एवढी जमीन लागवडीखाली होती. यंदा खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रात आणखी वाढ झालेली आहे. यंदा २ लाख ७१ हजार ५० चौरस मीटर जमिनीची म्हणजेच सुमारे २७.१०५ हेक्टर जमीन आणखी लागवडीखाली आलेली आहे.

यंदा आणखी २७.१०५ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

बाणावली परिसरातील फान्सिस्को कुतिन्हो या शेतकऱ्याची ८,९५० चौरस मीटर, जॉन बर्रेटो या शेतकऱ्याची ६,१०० चौरस मीटर, मारियन फर्नांडिस याची ६,००० चौरस मीटर, राय येथील तनिशा कार्व्हालो यांची २,००० चौरस मीटर, नावेलीतील गॉडफी डायस यांची २८ हजार चौरस मीटर यांसह चिंचणी फार्मस क्लबकडून २ लाख चौरस मीटर अशी मिळून एकूण २७.१०५ हेक्टर जमीन यंदा खरीप हंगामात लागवडीखाली आली आहे.

१०१ जणांना शेतकरी आधार निधीचा लाभ

‘शेतकरी आधार निधी’ योजनेअंतर्गत प्रतिहेक्टर २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. यंदा या योजनेखाली सासष्टीतील १०१ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यांना एकूण ११ लाख ८० हजारांचा निधी देण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ‘कृषी कार्ड’ असणे बंधनकारक आहे.

कृषी खात्याच्या प्रयत्नांमुळे यश!

मडगाव विभागीय कार्यालयाकडून मडगाव व मुरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जाते. शेतकऱ्यांना आवश्यक ती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासह बियाणे उपलब्ध करून दिले जाते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे मडगाव विभागात कृषी क्षेत्रात वाढ होत आहे, असे मत विभागीय कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी व्यक्त केले आहे.