सुनेला द्यावा लागणार सासूला देखभाल खर्च

वयोवृद्ध महिलेला मिळाला न्याय : देखभाल लवादाचा निर्णय

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd June 2022, 12:10 Hrs
सुनेला द्यावा लागणार सासूला देखभाल खर्च

वास्को : मुरगाव तालुका देखभाल लवादाने एक दावा निकालात काढताना सुनेला तिच्या सासूला प्रतिमहिना १० हजार रुपये देखभाल खर्च आणि तिच्या राहत्या घराची दुरुस्ती करून देण्याचा आदेश दिल्याने एका वयोवृद्ध महिलेला न्याय मिळाला आहे.
बायणा येथील एका ८५ वर्षीय महिलेने तिची सून आणि नातू आपली देखभाल करत नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक व पालक देखभाल आणि कल्याण कायदा २००७ अंतर्गत येथील देखभाल लवाद कार्यालयात दाखल केली होती. मुरगाव तालुका ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष अनिल चोडणकर यांनी वादीतर्फे बाजू मांडली. प्रतिवादी सुनेने गैरमार्गाने आपल्या सासुचे राहते घर स्वतःच्या नावावर करून घेतले आणि त्या घराचा बराचसा भाग भाडेपट्टीवर दिला आहे आणि त्याचे भाडे स्वतः घेते परंतु त्याचा एकही रुपया ती आपल्या सासुला देत
नव्हती. तिची देखभालही करीत नव्हती. स्वतःचे घर असूनही तिला एका लहानशा खोलीत ठेवले होते. घराची दुरुस्तीही न केल्याने तिला पावसाळ्यात खोलीच्या छपरातून गळणाऱ्या पाण्यात दिवस काढावे लागतात. घरात शौचालयही नसल्याने तिची कुचंबणा होत होती. एका खोलीत सासूला व इतर खोल्यांमध्ये भाडेकरी ठेवून सून मात्र दुसरीकडे राहत होती. त्यामुळे सासुला एकाकी जीवन जगावे लागते. तिची ही अवस्था ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता अनिल चोडणकर यांनी देखभाल लवाद आधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रतिवादीने आपल्यावरील सर्व आरोप मान्य केल्याने देखभाल लवाद अधिकाऱ्याने सुनेला तिच्या सासुला प्रतिमहिना दहा हजार रुपये देखभाल खर्च म्हणून देण्याचा तसेच शौचालयसह घराची दुरुस्ती आणि योग्यरितीने तिची देखभाल करण्याचा आदेश दिला. या आदेशाचे पालन न केल्यास तिच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.