भुईपाल येथे रोलिंग चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


22nd June 2022, 12:06 am
भुईपाल येथे रोलिंग चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

भेडशेवाडा-भुईपाल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भेडशेवाडा संघाचे खेळाडू मान्यवरांकडून चषक स्वीकारताना.

पणजी : भेडशेवाडा-भुईपाल येथे त्रिकोणी रोलिंग चषक क्रिकेट स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा २०२२ ते २०२४ अशी तीन वर्षे खेळविण्यात येणार आहे. येथील साईनाथ ताटे यांनी आपले वडील स्व. बोमो जानू ताटे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दरम्यान, रविवारी (दि.१९) दिवसभरात खेळविण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला पंच सया पावणे, समाजाचे अध्यक्ष बि.डी. मोटे, माजी अध्यक्ष धाकू पावणे, भागो झोरे, धुळू शेळके, प्रशांत मोटे आणि विठोबा बोडके उपस्थित होते. यावेळी स्व. बोमो ताटे यांच्या फोटोला फुले व हार घालून स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात केली. सूत्रसंचालन विद्धेश येडगे यांनी केले.
यावेळी धाकू पावणे यांनी आमचे मित्र स्व. बोमो ताटे यांच्या कुटुंबियांनी गावातील युवकांसाठी तीन वर्षांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करून करून आपल्या मित्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे सांगितले. बि.डी. मोटे म्हणाले, भुईपाल गावातील तरुण युवक पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करीत असून वेगवेगळ्या क्षेत्रातून युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच आयोजकांना व सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
साईनाथ यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जाग्या करताना डोळ्यातील अश्रू आवरत सर्व मान्यवरांचे आभार मानले. दरम्यान, स्थानिक पंच सया पावणे यांच्या हस्ते मैदानावर नारळ फोडून खेळाला सुरुवात केली.

भेडशेवाडा बॉईज संघाला विजेतेपद
या स्पर्धेचा अंतिम सामना भेडशेवाडा बाईज संघ आणि चोडणकर संघ यांच्यात खेळविण्यात आला. भेडशेवाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावा केल्या. फलंदाज भागो झोरे यांनी अर्धशतकी खेळी (६८ धावा) करत धावांचा डोंगर उभा केल्या. दरम्यान, चोडणकर ‌संघाने सुरुवातीलाच दबावाखाली खेळताना एका मागोमाग एक विकेट्स फेकल्या. त्यांचा संघ ४० धावांवर बाद झाला. चोडणकर संघाच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. गोलंदाज विठू झोरे यांनी सलग ३ गडी बाद करत आपली पहिलीवहिली हॅट्रीक केली. अजय शेळके यांनी ३, भागो झोरे १, दीपक झोरे २ विकेट्स घेतल्या.
अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार भागो झोरे यांना तर स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज किशोर गावडे आणि फलंदाज आणि मालिकावीर पुरस्कार भागो झोरे यांना मिळाला. उपस्थित मान्यवर धुळू शेळके, साईनाथ ताटे, प्रशांत मोटे, लक्षीमण बोडके आणि रामा ताटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या भेडशेवाडा बॉईज संघाला विजयी चषक देऊन गौरविण्यात आले. तर चोडणकर बॉईज संघाला विजेतेपदावर समाधान मानावे लागले.