धारगळ येथे ट्रकला फॉर्च्युनर कारची धडक; तिघे जखमी


21st June 2022, 12:08 am
धारगळ येथे ट्रकला फॉर्च्युनर कारची धडक; तिघे जखमी

अपघातग्रस्त वाहन आणि अग्निशमन दलाचे जवान. (निवृत्ती शिरोडकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे :
वशालबाग-धारगळ येथे सोमवारी (दि.२०) पहाटे ५ वा. फॉर्च्युनर गाडीने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे फॉर्च्युनर गाडीतील तिघे जण जखमी झाले. या गाडीमध्ये एकूण पाच जण होते. गाडीचा ताबा सुटल्यामुळे कार चालकाने ट्रकला मागून धक्का दिला.
फॉर्च्युनर गाडी (क्र. एमएच-०७-क्यू-९००५)ने हिमांशू, रौनाक देसाई, सागर, विक्रम आणि तन्मय खानोलकर हे कळंगुट बागाहून ओरोस-कुडाळ येथे जात होत‍े. ट्रक (क्र. जीए-०३-टी-७२८४) चालक अरुण साळगावकर हा अस्नोडा येथून साटेली येथे जात होता. सदर घटना पेडणे अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे सहाय्यक अधिकारी आणि जवानांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सदर फॉरचूनर गाडीचा धक्का जोरात बसल्यामुळे गाडीतील तिघेजण दार उघडून बाहेर पडले होते. तर दोघेजण गाडीत अडकून पडले होते. त्यातील गाडीचालक हिमांशू हा स्टेअरिंगमध्येच अडकून पडला होता. जवानांनी स्टेअरिंग व सीटचा भाग अत्याधुनिक यंत्रणेने कट करून हिमांशू आणि ‍चालक सीटच्या मागे अडकलेल्या विक्रमला बाहेर काढून दोघांनाही जखमी अवस्थेत आझिलो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
अग्निशमन दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रदीप आसोलकर, चालक प्रमोद गवंडी, जवान अमोल परब, जवान अमित सावळ, जवान संदेश पेडणेकर, जवान विकास चौहान, जवान राजेश परब, जवान यशवंत नाईक यांनी शिस्तबद्धतीने जखमीला बाहेर काढण्यात यश मिळवले.            

हेही वाचा