शिवोलीत ठिकठिकाणी क्रीडा मैदाने उभारणार : लोबो

उडो बीच क्रीडा मैदानाचे उद्घाटन


23rd May 2022, 12:00 am
शिवोलीत ठिकठिकाणी क्रीडा मैदाने उभारणार : लोबो

दांडा-शिवोली येथे उडो बीच क्रीडा मैदानाच्या नामफलकाचे अनावरण करून उद्घाटन करताना आमदार डिलायला लोबो. विरोधी पक्षनेते मायकल लोबो, पंचायत मंडळ व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
शिवोलीमध्ये क्रीडा मैदानाची उणीव असल्याची खंत स्थानिकांनी निवडणुकीपूर्वी व्यक्त केली होती. येथील युवकांची गरज ओळखून अवघ्या काही दिवसांत या दांडामधील मैदानाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आगामी चार वर्षांत शिवोली मतदारसंघात विविध ठिकाणी क्रीडा मैदान उभारली जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी दिली.
दांडा-शिवोली येथे उडो बीज दांडा स्पोर्टस् क्लब या मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी लोबो बोलत होते. आमदार डिलायला लोबो यांच्या हस्ते या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच शर्मिला वेर्णेकर, उपसरपंच विल्यम फर्नांडिस, पंच सदस्य शोनल आगरवाडेकर, सिल्वेस्टर फर्नांडिस, फ्रेडी फर्नांडिस, क्लबचे अध्यक्ष किशोर शिरोडकर, सचिव संतोष वायंगणकर, खजिनदार मुकेश तोरस्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.
लोबो म्हणाले, येथील चर्च मैदान सगळ्यात प्रसिद्ध आहे. या मैदानात आवश्यक सुधारणा करण्यासाठी चर्च समितीकडे चर्चा झालेली आहे. पुढील काही दिवसांत मैदानाचा कायापालट केला जाईल. सडये पंचायत क्षेत्रातही क्रीडा मैदान उभारण्याचा प्रयत्न आहे. आसगावमधील क्रीडा मैदानाचे अर्धवटस्थितीत असलेले काम पूर्ण केले जाईल. या उडो बीच मैदानाजवळ काही दिवसांत बाल उद्यान उभारण्यात येईल. स्थानिक क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी शक्य ती मदत दिली जाईल, असेही लोबो म्हणाले. यावेळी आमदार डिलायला लोबो यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, याप्रसंगी शिवोली वेटरन्सविरुद्ध मोरजी वेटरन्स या संघाचा प्रदर्शनीय सामना मैदानावर खेळविण्यात आला.