गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव निश्चित!

|
20th May 2022, 11:48 Hrs
गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव निश्चित!

नवी दिल्ली : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे चिंतन शिबिर अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, उदयपूर चिंतन शिबिरातून पक्षाला काहीही मिळालेले नाही. या शिबिरातून काँग्रेस नेतृत्वाला म्हणजेच गांधी घराण्याला आपले अस्तित्व वाचवण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. यासोबतच प्रशांत किशोर यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पराभवाचा अंदाज वर्तवला आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विट करून म्हटले, मला वारंवार उदयपूर चिंतन शिबिरावर टिप्पणी करण्यास सांगितले जात आहे. परंतु माझ्या मते, उदयपूर चिंतन शिबिर कोणताही अर्थपूर्ण उद्देश पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. या शिबिरामुळे काँग्रेस नेतृत्वाला किमान गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांपर्यंत आणखी काही काळ मिळाला आहे. प्रशांत किशोर यांनी एप्रिलमध्ये काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी ६०० पानांचे सादरीकरण दिले होते.

आम्ही पुन्हा जनतेमध्ये जाऊ : राहुल गांधी

काँग्रेसने उदयपूरमध्ये तीन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ४०० हून अधिक प्रमुख नेते सहभागी झाले होते. शिबिरात काँग्रेसने एक कुटुंब-एक तिकीट, तरुणांना संघटनेत आरक्षण, देशभर पदयात्रा काढणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले होते की, आम्ही पुन्हा जनतेमध्ये जाऊ, त्यांच्याशी आमचे संबंध दृढ करू आणि हे काम शॉर्टकटने होणार नाही. हे काम मेहनतीने पूर्ण होईल.