शिस्त आणि न्यायप्रिय अॅड. हर्षा राजीव नाईक

असे म्हटले आहे की जो माणूस अन्यायाचा प्रतिकार करतो तोच न्यायाची अपेक्षा करू शकतो. अश्याच अपेक्षांची झोळी घेऊन न्यायदानाची याचना करणार्‍या प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवायचे काम एक वकीलच करू शकतो. आजचा लेख आहे शिस्त आणि न्यायप्रिय महिला वकील हर्षा राजीव नाईक यांच्या जीवनावर

Story: गगनभरारी | सिंथिया कृष्णा गावकर |
20th May 2022, 10:19 Hrs
शिस्त आणि न्यायप्रिय अॅड. हर्षा राजीव नाईक

हर्षा नाईक यांचा जन्म १८ ऑगस्ट, १९७७ साली मडगांव शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण ज्ञानदा बांदोडकर शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा येथे पूर्ण केले. त्यांनी वकील होण्यासाठी पहिली पायरी वि. एम. एस. साळगावकर कायदा महाविद्यालय मिरामार पणजी येथे चढली. संगीत, नृत्य, विविध ठिकाणांना भेट देणे याची त्यांना फार आवड. वडील श्री. नारायण नाईक  शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याकारणाने लहानपणीच त्यांच्या अंगी शिस्त लावण्यात आली. त्यांची आई सौ. सुनीला नाईक एक उत्तम गृहिणी व सदोदित पाठिंबा देणारी आई आहे. घरात तीन बहिणी आणि एक भाऊ अशा कुटुंबात, हर्षा थोरल्या असल्याने लहानपणीच त्यांना जबाबदारीची जाणीव झाली होती.

त्यांना लहानपणी भारतीय सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करण्याची खूप इच्छा होती. पण काही कारणांमुळे त्यांचं स्वप्न साकार नाही होऊ शकलं. मनात देशसेवेची ज्योत तेवत ठेवून त्यांनी न्यायदानाचे कार्य हाती घेतले. अर्थातच यासाठी त्यांना भरपूर कष्ट घ्यावे लागले.  त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणून २००० साली त्यांना वकील ही उपाधी प्राप्त आली.

१४ एप्रिल, २००४ साली त्यांची लग्नगाठ श्री. राजीव नाईक यांच्याशी बांधण्यात आली. घर-संसार सांभाळत असता त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्या गेली एकवीस वर्षे अविरतपणे न्यायदेवतेची सेवा करत अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करीत आहेत.  त्या सांतईनेझ येथील 'जेसीआय' गटाच्या अध्यक्षा तर 'आशा महाल इन्स्टिट्यूट' आणि 'अखिल भारतीय वकील संघटने' च्या सचिव पदी कार्यरत आहेत. तसेच त्या 'गोमंतक मराठा समाजा' च्या केंद्रीय समितीच्या सदस्या आहेत. विविध उच्च माध्यमिक विद्यालय अणि महाविद्यालयांमध्ये  कायदा संबंधी विषयांवर मार्गदर्शन तथा समुपदेशन त्या करत आहेत.

जीवनात अखेरच्या श्वासापर्यंत गरजूंना मदत करण्याची इच्छा त्यांच्या मनी आहे. त्याच बरोबर त्यांच्या शिक्षणाचा लाभ अनेकांना घेता यावा म्हणून त्या सदोदित प्रयत्न करत असतात.  जीवनात अनेक चांगले तसेच वाईट प्रसंग घडतात. आपण दर वेळी इच्छाशक्तिच्या जोरावर कष्ट करत रहायचे. परमेश्वर एक ना एक दिवस नक्कीच फळ देईल असे त्यांचे ठाम मत आहे. कायदा अभ्यासक अॅड. सतीश सोनक यांना त्या प्रेरणास्थान मानतात तसेच त्यांना यशाचे शिखर गाठायला मदत केल्याबद्दल त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे ऋण व्यक्त करू इच्छितात. त्या म्हणतात की, प्रत्येक महिला स्वत:च्या पायांवर उभी राहिली तरच देश प्रगती करू शकतो. त्यांची मुलगी कु. आर्या नाईक एक प्रामाणिक आणि सन्माननीय व्यक्ती म्हणून समाजात नावारूपास यावी अशीही त्यांची तीव्र मनोकामना आहे.