भटक्या गुरांवर रसायन फेकल्याने संताप

संबंधितांवर कारवाईची मागणी

|
17th May 2022, 12:26 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता
वास्को : मांगोरहिल भागात रस्त्यावर भटकणाऱ्या गुरांपैकी काही गुरांच्या मागील भागावर अज्ञाताने रासायनिक द्रवपदार्थ टाकल्याने मोठ्या जखमा घेऊन ती गुरे भटकत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्याविरोधात, तसेच रस्त्यावर गुरे सोडणाऱ्या मालकांविरोधात कारवाई करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकाराबद्दल संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
गेले चार-पाच दिवस ती गुरे जखमा घेऊन फिरत आहेत. जखमा पाहून सर्वसामान्य हळहळत आहेत. ही गुरे मांगोरहिल येथील असल्याचे समजते. त्यांच्यावर रासायनिक द्रवपदार्थ टाकून त्यांना जखमी करण्यामागील व्यक्तीची मानसिकता समजण्यास मार्ग नाही. कदाचित ही गुरे एखाद्या व्यक्तीच्या दुकानासमोर, घरासमोर बसून घाण करत असावीत. त्यामुळे वैतागून अज्ञात व्यक्तीने त्या मुक्या गुरांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्यावर रासायनिक द्रवपदार्थ टाकले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या भटक्या गुरांच्या मालकांनीही त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी त्यांना तसेच सोडल्याचे समजते. त्यांच्यावर औषधोपचार होण्याची गरज होती. त्याबाबतीत त्यांनी उत्सुकता दाखविली नसल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्या गुरांवर रासायनिक द्रवपदार्थ टाकणारी ती व्यक्ती जेवढी जबाबदार आहे, तेवढेच ते मालकही जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.