एका कुटुंबात एकालाच तिकीट गांधी घराण्याला मात्र नियमातून सूट

काँग्रेसच्या चिंतन शिबिरात समितीची शिफारस

|
14th May 2022, 12:53 Hrs
एका कुटुंबात एकालाच तिकीट  गांधी घराण्याला मात्र नियमातून सूटउदयपूर : पुढील निवडणुकांपूर्वी तिकीट देण्याच्या बाबतीत काँग्रेसने मोठा फेरबदल करण्याची तयारी केली आहे. आता एका कुटुंबातील केवळ एकच तिकीट मिळणार आहे. या नियमातून केवळ गांधी घराण्याला सूट देण्यात येणार आहे.

काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सरचिटणीस अजय माकन यांनी उदयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आमच्या पॅनलमध्ये ‘एका कुटुंबात एक तिकीट’ हा फॉर्म्युला लागू करावा यावर चर्चा झाली आहे. ज्याला तिकीट दिले जाईल, त्याने किमान पाच वर्षे पक्षात काम केलेले असावे. थेट तिकीट देऊ नये. नवोदित नेत्यांना तिकीट मिळणार नाही. मात्र, गांधी परिवाराला या नियमात सूट देण्यात आली आहे. हे सूत्र त्यांना लागू होणार नाही.
राजस्थानच्या उदयपूर शहरात काँग्रेसचे तीन दिवस चिंतन शिबिर चालणार आहे. या शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीने वरील नियमांची शिफारस सादर केली आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला मजबूत करणे, हा शिबिर घेण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
सलग पाच वर्षे पक्षात काम केल्यानंतर कोणालाही दुसरे पद देऊ नये, अशी शिफारसही करण्यात आली आहे. किमान तीन वर्षांचा ‘कूलिंग पीरियड’ असावा. पुढील कोणतेही पद तीन वर्षांच्या अंतरानंतरच दिले पाहिजे, असे माकन यांनी सांगितले.
एखाद्या नेत्याच्या मुलाला किंवा दुसऱ्या नेत्याला तिकीट घ्यायचे असेल, तर त्याला किमान पाच वर्षे संघटनेत काम करावे लागेल. सलग पाच वर्षे पदावर न राहण्याचा नियम काँग्रेसमध्ये लागू झाल्यास निम्म्याहून अधिक नेते बाहेर होतील. नेत्यांच्या मुलांनाही पाच वर्षे पक्षात काम केल्यावरच तिकीट मिळणार आहे.
गांधी घराण्यावर या तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत माकन यांना विचारले असता ते म्हणाले की, हा प्रश्न गांधी घराण्याचा नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक संघटना निवडणुकीच्या प्रक्रियेतून होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडीचा चिंतन शिबिराशी काहीही संबंध नाही.

‘एक कुटुंब एक तिकीट’ ही तरतूद गांधी कुटुंबाला लागू होणार नाही. काँग्रेसने एक कुटुंब-एक तिकीट फॉर्म्युला लागू करण्याची शिफारस केली आहे, परंतु मोठ्या राजकीय घराण्यांसाठीही वाट सोडली आहे, असे अजन माकन यांनी स्पष्ट केले आहे.