सेरूला जमीन व्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल

२२ जणांवर खोटे दस्तावेज : १२४ साक्षीदारांची साक्ष नाेंद


13th February 2022, 01:07 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सेरूला कोमुनिदाद जमीन व्यवहारप्रकरणी गुन्हा शाखेने कोमुनिदादचे माजी एटोर्नी आग्नेल लोबो, रेजिनाल्ड लोबो, जोझफ डिसा यांच्यासह केदार नाईक या लाभधारकाबरोबर इतर २२ जणांवर खोटे दस्तावेज तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, वरील सर्वांवर २ कोटी ९० लाख १७ हजार रुपये किमतीची ८,१५१.७५ चौ.मीटर जमीन गैरप्रकार आणि फसवणूक केल्या प्रकरणी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात शाखेने १२४ साक्षीदारांची साक्ष नोंद केली आहे.
या प्रकरणी मिंगेल वाझ यांनी प्रथम गुन्हा शाखेकडे २०१७ मध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी २८ नोव्हेंबर २०१६ पूर्वी कटकारस्थान रचून जमिनीचे खोटे दस्तावेज करून अर्ज न केलेल्यांना २ कोटी ९० लाख १७ हजार रुपये किमतीची ८,१५१.७५ चौ. मीटर जमीन विक्री केल्याचा आरोप केला होता. संबंधित जमिनीची मार्केट रेट ६ कोटी ७५ लाख ९६ हजार रुपये इतकी असल्याची माहिती तक्रारीत नोंद केली आहे. या प्रकरणी पूर्वी एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्यांनी दुसरा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर वाझ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करून संबंधित प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर खंडपीठाच्या आदेशानुसार, गुन्हा शाखेने कोमुनिदादचे माजी एटोर्नी आग्नेल लोबो, रेजिनाल्ड लोबो, जोझफ डिसा यांसह केदार नाईक या लाभधारकाबरोबर २२ जणांविरोधात भा.दं.सं.च्या कलम ४०३, ४०९, ४७१, ४७१ व १२०बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ७, १३(१)ए,बी,डी(२) नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गावडे यांनी चौकशी पूर्ण करून १२ फेब्रुवारी रोजी सेरूला कोमुनिदाद जमीन व्यवहार प्रकरणी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात २६ जणांविरोधात १,५०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यात गुन्हा शाखेने १२४ साक्षीदारांची साक्ष नोंद केली आहे.