पर्रीकरांचा वारसा आणि राजकारण

मनोहर पर्रीकर यांच्या नावाचा वापर यामुळेच आज कोणीही आलतू फालतू नेते करू लागले आहेत आणि त्यात मायकल लोबो, कार्लुस आल्मेदा यांच्यासारखे टुकार नेतेही मागे नाहीत. मायकल लोबो यांनी पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्यावर बोलावे म्हणजे अतिच झाले.

Story: विचारचक्र | वामन प्रभू, (लेखक ज्येष्ठ प� |
21st January 2022, 11:23 pm
पर्रीकरांचा वारसा आणि राजकारण

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या नावाखाली जे काही आज चालले आहे त्यास राजकारण म्हटले जात असेल तर आमच्यासाठी ते नवीनच आहे. भाऊसाहेब बांदोडकरांपासून मनोहर पर्रीकरांपर्यंत सर्वांच्याच काळातील राजकारण पाहात आम्ही  मोठे झालो; परंतु राजकारणाचा एवढा  घसरलेला स्तर आम्ही कधी पाहिला नाही.  दुर्दैवाने तोही पाहणे आज नशिबी आले आहे. राजकारणाचा पार चोथा झाल्याचे भयानक आणि तेवढेच दुर्दैवी चित्र आज गोव्यात दिसत आहे. मागील तीन दशकांत,  मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तर एकूण राजकारणाने खूपच विकृत वळण घेतले आहे आणि अजून ते कोठेही  पोचू शकेल अशीच साधारण स्थिती आहे. वाईट वाटते की मनोहर पर्रीकर यांचा  वारसा हा या निवडणुकीच्या राजकारणात वादाचा विषय बनावा आणि  पर्रीकर यांच्या पायाशीही बसण्याची ज्यांची लायकी नव्हती त्यांनी त्यावर मनाला येईल ते बोलावे याचेच. मनोहर पर्रीकर यांना नेहमीच पाण्यात पाहणारे, त्यांच्यावर गंभीर आरोप करून आपला स्वार्थ साधू पाहणारे आज त्यांच्या राजकीय वारशाबाबत बोलताना त्यांचे जे गुणगान गात आहेत, मगरीचे अश्रु ढाळत आहेत  हे  सर्व पर्रीकर यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना खरोखरच असह्य व्हावे असेच आहे.  

मनोहर पर्रीकर यांचे राजकारण अगदी जवळून ज्यानी सुमारे अडीच दशके पाहिले असेल त्यातील मी स्वतःला एक समजतो. गोव्यात भाजप वाढवण्याकरिता, त्या पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी मनोहर पर्रीकर यानी ज्या खस्ता खाल्ल्या, जो त्याग केला, अविश्रांत काम केले ते मी अगदी जवळून बघितले आहे. त्याचे अनेक चटकेही त्यानी निमूटपणे  सोसले आहेत. भाजपची गोव्यातील पुरती जडणघडण तर पर्रीकर यांनीच केली .गोव्याचे विकास पुरुष  म्हणून  तर अवघा देश त्याना ओळखतो. संरक्षण मंत्री म्हणूनही त्यानी आपली खास अशी नाममुद्रा ऊमटवलेली आहे आणि त्याचा विसर देशाला कधी पडणार नाही .मग त्यांचा हा प्राणप्रिय  गोवा त्याना कसा विसरू शकेल ? परंतु निवडणुकीच्या निमित्ताने आपले  राजकारण खेळण्याकरिता त्यांच्या  नावाचा जो वापर होत आहे तो टाळायला हवा आणि तो बंद करायचा असेल तर त्याची सुरूवात खरे तर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यानीच करायला  व्हायला हवी असे माझे प्रामाणिक मत आहे.

उत्पलला मी साधारण १९९४ पासून म्हणजे सुमारे २६-२७ वर्षे ओळखतो. मागील दोन अडीच वर्षात त्याच्याशी तसा संपर्क राहिलेला नाही हेही खरं. मनोहर पर्रीकर यांचा आपल्या मुलांनी राजकारणात यावे यास कायम विरोध राहिला. किंबहुना त्यांनी मुद्दाम होऊन त्याना कोठेही लुडबुड करू दिली नाही हे मीच कशाला सारा गोवा आज जाणतो. मुख्यमंत्री असताना उत्पल-अभिजात या दोघांनी  बंगल्यावर फिरकलेलेही त्याना खपत नसे. त्यामुळे आम्हा पत्रकारांनी या दोघाना मुख्यमंत्र्यांच्या  बंगल्यावर क्वचितच पाहिले असेल.आज उत्पल पर्रीकर वडिलांच्या निधनानंतर त्यांचा उज्ज्वल असा वारसा पुढे घेऊन जाण्यास सज्ज झाला असेल तर त्यासही कोणी  आक्षेप घेण्याची गरज नाही  आणि तो का घ्यावा? वडील असताना राजकारणात शिरण्याची त्यांची सुप्त इच्छा कदाचित वडिलांच्या ठाम भूमिकेमुळे पूर्ण झाली नसावी असेही होऊ शकते. उत्पलला आता तसे वाटत असेल, निवडणुकीत उतरण्याची इच्छा असेल तर त्याचे उलट स्वागतच झालं पाहिजे. उत्पल सुशिक्षित, उच्च शिक्षित तर आहेच त्याबरोबर वडीलांबरोबर राजकारणही  त्याने पाहिले आहे..त्याच्या उमेदवारीस विरोध असायचा येथे प्रश्नच नाही  परंतु विषय तो नसून त्यास आज एकूण प्रकरणास जे भलतेच वळण मिळाले आहे वा मुद्दाम होऊन ते देण्याचा जो प्रयत्न होत आहे ते खटकणारे  आहे.  भाजपचे गोवा निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यानी  उत्पलना ते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत म्हणून त्याना ऊमेदवारी देता येणार नाही असे जे विधान केले त्यास मनोहर पर्रीकरांवर भरभरून प्रेम  करणाऱ्यांनी ऊत्तर देणे अपेक्षितच होते पण स्वतः ऊत्पलने त्यावर जी बोलकी  प्रतिक्रिया दिली ती सगळ्यानाच भावली. त्यानंतरच खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या वादात ऊडी घेत आपला राजकीय स्वार्थ साधण्याची संधी साधली आणि  अनेक उलटसुलट  विधाने करत उत्पलला भावनिक साद घातली. मनोहर पर्रीकर यांना त्यांच्या जिवंतपणी  दूषणे देण्यातच ज्यानी धन्यता मानली त्या संजय राऊत यांच्यासारखे  अनेक नेते यात आघाडीवर होते. अरविंद केजरीवाल  आणि  संजय राऊत यानी त्यापुढे जाऊन सर्जिकल स्ट्राईकवर संशय उपस्थित करून निर्लज्जपणाचा  कळस केला होता आणि  आता हीच मंडळी आज पर्रीकरांचा वारसा पुढे नेण्याच्या  गोष्टी करत आहेत याला काय म्हणावे ?  आताच त्यांच्या  पर्रीकरांवरील प्रेमाला पान्हा का फुटला हे त्याना ठणकावून कोणी तरी विचारण्याची गरज होती. फडणवीसांना ठणकावून ऊत्तर देणारे उत्पल पर्रीकर असो वा त्यांचे कोणीही समर्थक त्यासाठी का पुढे आले नाहीत या प्रश्नाचे मात्र  उत्तर मिळत नाही. उत्पल पर्रीकर यानी स्वतः त्याना सहानुभूती देणाऱ्या अशा नेत्यांची प्रथम हजेरी घेऊन आपल्याला कोणाच्या पोकळ सहानुभूतीची गरज नसल्याचे तेवढ्याच कडक शब्दात  सांगितले असते तर आज एकूण चित्रच पालटले असते. परंतु आज त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अशा सहानुभूतीची गरज वाटते असा अर्थ त्यातून कोणी काढला तर तो चुकीचा कसा म्हणता येईल. मनोहर पर्रीकर यांच्या नावाचा वापर यामुळेच आज कोणीही आलतू फालतू नेते करू लागले आहेत आणि त्यात मायकल लोबो, कार्लुस आल्मेदा यांच्यासारखे टुकार नेतेही मागे नाहीत. मायकल लोबो यानी पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्यावर बोलावे म्हणजे अतिच झाले. त्यानाही कोणी तरी आवरण्याची आता गरज आहे. कोणालाही आवडो वा ना आवडो बाबुश मोंसेरात हे आज पणजीचे लोकनियुक्त आमदार आहेत हे मान्य करूनच पुढे जायला हवे परंतू तसे होताना दिसत नाही.

मनोहर पर्रीकर यांचा उज्ज्वल वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी उत्पल पर्रीकर आपल्या वडिलांनीच वाढवलेल्या पक्षाशी  लढा देत असल्याचे जे चित्र दिसत आहे, ते पक्षाच्या निकोप वाढीस हानी पोचवू शकते  याचा सारासार विचार व्हायला हवा. पणजी मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्यावर उत्पल पर्रीकर ठाम दिसतात. पणजीत वडीलांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची  जबाबदारी  अपक्ष म्हणून निवडणूक लढवून उत्पल पर्रीकर कशी पार पाडतात हे शेवटी  मतदारच ठरवणार आहेत. त्यातूनच पणजीचा वारसा उत्पल पर्रीकर यांच्याकडे राहील की तो भाजपकडे जाईल हेच प्रामुख्याने स्पष्ट होईल.