वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन

वर्षभरात ८ कोटींचा दंड वसूल

|
21st January 2022, 12:54 Hrs


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात वाढते अपघात आणि मृत्यूची दखल घेऊन वाहतूक पोलीस विभागाने २०२१ मध्ये विविध वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या ७,४१,३१९ जणांवर कारवाई करून ८ कोटी ६५ लाख १९ हजार २५० रुपये दंड वसूल केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार, २,५६८ जणांचे वाहन परवाने निलंबन करण्यात आले असून ९,५७८ जणांचे वाहन परवाने निलंबन करण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिली आहे. याबाबत वाहतूक विभागाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन वरील माहिती दिली आहे. यावेळी उत्तर गोवा वाहतूक विभागाचे उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, राज्यात वाढते अपघात मृत्यूची दखल घेऊन वाहतूक पोलीस विभागाने १३ रोजी पासून विविध वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ रोजी पर्यंत काळ्या काचाचे उल्लंघन प्रकरणी १ हजार, वेगमर्यादेचे उल्लंघन प्रकरणी १७५, वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्या प्रकरणी १०३, हेल्मेट न परिधान करणारे २,४७९, अल्पवयीनांनी वाहन चालविल्यामुळे २०, वाहन परवाना नसताना वाहन चालविल्यामुळे १५७, सिग्नलचे उल्लंघन केल्यामुळे ६२, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक केल्या प्रकरणी ९९, मालवाहू वाहनातून जास्त मालाची वाहतूक केल्या प्रकरणी २४९ मिळून ४,३४४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे संबंधितांचे वाहन परवाने निलंबित करण्यात येणार आहे. त्यांच्यावर भादंसंच्या कलम २७९, ३३६ अंतर्गत आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक अधीक्षक प्रभुदेसाई यांनी दिली.