डॉ. नीता तोरणे यांची कविता : साडी

भारतीय परंपरेत मानाचे स्थान असलेल्या साडीचे वेगळेपण आणि महत्त्व वर्णन करणारी डॉ. नीता तोरणे यांची ‘साडी’ ही कविता.

Story: कवितेतील भावतरंग। चित्रा क्षीरसागर |
09th January 2022, 12:34 Hrs
डॉ. नीता तोरणे  यांची कविता :  साडी

साडी

बाईच्या साडीला असतो 

एक वाटण्या न वाटण्यापलीकडचा इतिहास

 आणि स्मरणात घर करून राहिलेला भूगोल 

तिच्या कधीच नसलेल्या घराचा 

बाईच्या डोक्यात उमटत असतात सजत

रंग तिच्या स्वप्नाळू इंद्रधनूचे 

आणि तिच्या अपूर्ण इच्छांचे 

तरंग जे तिने विकत घेतलेले असतात 

आपल्या घरट्यासाठी पिल्लांसाठी सर्वस्व देऊन

कधी कधी तिची साडी बनते

तिचं छोटसं भावजीवनाचं अवकाश 

ज्यात ती विहरते बेबंद पक्षिणी बनून 

कधी कधी तिच्या साडीचा पोत

असतो अतीव सुखदुःखाच्या मोहराने लगडलेला 

पुन्हा एकदा ज्यात तिने पाहिलेले 

असतात आयुष्याचे 

कोरडे पावसाळे आणि बेहिशोबी उन्हाळे 

कधी कधी बाई साडीत लपवते 

दाटलेलं वेदनांचं शेवाळ 

आणि मिरवीत राहते चारचौघात 

हिरव्या ऋतूंची हिरवी स्वप्नं 

साडीत हिरव्या रंगातून 

तशी प्रत्येक बाईची आवडती 

साडी असते तिच्या समर्पणाचे प्रतीक 

ज्यात लपलेलं असतं 

पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या 

तिच्या बिनचेहऱ्याच्या त्यागाचं 

घरभर संचित, जे तिला केवळ

बाई म्हणून जपावच लागत 

समज आल्यापासून 

ही साडी फक्त शरीर झाकण्याचं साधन नाही तर भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणजे साडी आहे. या साडीच्या पदराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या पौराणिक कथांतून या साडीसंबंधी अनेक दाखले व उदाहरणे दिली आहेत. महाभारतातील बहीण-भावाचे नाते सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. त्यापैकी द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण ही जोडी. द्रौपदीने आपला भरजरी शालू फाडून त्याची चिंधी करून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली. त्या बोटाला बांधलेल्या चिंधीची परतफेड श्रीकृष्णाने महाभारतात कौरवांच्या सभेत तिला वस्त्रे पुरवून तिच्या अब्रूचे रक्षण केले. हा महाभारत नावाचा इतिहास साडीच्या प्राचीनतेची साक्ष देतो. रामायणकाळात महालातील स्त्रियादेखील भरजरी साड्या परिधान करीत. अशी ही साडी स्त्रीच्या संपूर्ण जीवनाशी निगडित आहे. तोच धागा पकडून डॉ. नीता तोरणे आपल्या कवितेतून साडीमहात्म्य वर्णन करतात.

या कवितेत कवयित्री म्हणते, 'बाईच्या साडीला इतिहास आहे. भूगोलदेखील आहे.' भारतात बहुतेक ठिकाणी महिला साडी नेसतात. कवयित्रीच्या कवितेतील नायिका साडीविषयी सांगते. साडीत ती घरभर वावरत असते. स्वप्न सजवत असते. इच्छा आकांक्षा ती घरात पेरत जाते. घरासाठी, मुलांसाठी, घर, घरातील माणसे हेच तिचं भावविश्व झालेलं असतं. आकाशभर जशी पाखरं विहरतात तशी ती घरभर बेबंद विहरत असते. तिची साडी फक्त कपडा उरत नाही. तर साडीचा उभा – आडवा धागा हा सुखदुःखाने विणलेला आहे, असं कवयित्री 

सांगते. 

सुख थोडंसं पण दुःखच खूप मिळालेलं असतं. कोरडे पावसाळे आणि बेहिशोबी उन्हाळे. आता सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन संसाराची मांडणी  करावी लागते. प्रत्येक क्षण हा सुखाचाच असेल असं नाही. कधी कधी काही क्षण हे उद्ध्वस्त होण्याचेही येतात. आता इथे साडी हे प्रतीक बाईच्या जीवनाचं आहे. ती साडी नेसते पण त्या साडीमागे सर्व परंपरा येतात. मनाच्या विरुद्ध झालेल्या घटना ती पदरात साठवून ठेवते. घट्ट ...शेवयासारखं!!!

तरीही ती हिरव्या ऋतुंचा, हिरव्या स्वप्नांचा उत्सव साजरा करत असते. मनाच्या वेदना मागे टाकून उत्साही वातावरणात राहावे म्हणून ती पापण्याआडचं पाणी दाखवत नाही. संसारात प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असं नाही. दुसऱ्याची मर्जी सांभाळत स्वतःच्या स्वप्नांना सुरुंग लावावा लागतो. स्वप्न मागे टाकावी लागतात. साडी हे परंपरेने आलेले संचित आहे, असं कवयित्री सांगते. जे तिला समज आल्यापासून जपावंच लागतं.  पूर्वी मुलगी मोठी झाली (वयात आली) की, तिला साडी नेसावी लागत असे. त्यावेळेपासून ती साडीतच संपूर्ण आयुष्याची गोळा बेरीज करत असे. 

तिचं समर्पण, त्याग, संचित, हिरवे ऋतू, स्वप्न, बेबंदपणे घरात जगणं, हे सर्व साडीच्या इतिहासात, भूगोलात सामावलेलं असतं हे सूत्र कवयित्री मांडते. घर, घरातील माणसं यांच्यासाठी झटलेली बाई, या कवितेतून सोशिक, त्यागी, वयाची काही वर्षे आई-वडिलांकडे व नंतर लग्न झाल्यावर नवऱ्याकडे. त्याच्याही पुढे मुलांकडे अशा तीन भागात स्त्रीच्या जीवनाची विभागणी आहे. साडी हे प्रतीक घेऊन तिच्या जीवनाचा आलेख कवयित्रीने मांडला आहे. डॉ. नीता तोरणे प्राध्यापिका आहेत. त्या जीवनाकडे शिक्षण या पद्धतीने पाहतात. रोजचा अनुभव त्या कवितेतून मांडतात. 

‘एक ओळ कवितेची’, 'जगताना', 'Quest for new life' आणि 'पुन्हा एकदा' अशी त्यांची पुस्तके आहेत. त्यांनी एक कवितासंग्रह वेगळ्या पद्धतीने प्रकाशित केला आहे. एकच कविता मराठी आणि तिचे कन्नड, इंग्रजी अशा त्रिविध भाषांत रुपांतरित केलेली आहे. अशा काही कविता या संग्रहात आहेत. 

‘साडी’ या कवितेत डॉ. तोरणे यांनी बाईच्या संपूर्ण जीवनाचा पट उलगडून दाखवला आहे. प्रत्येकाच्या जीवनात तीन अवस्था येतात. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण यांची गोळाबेरीज त्यांनी या कवितेत मांडली आहे. लहान किंवा अजाण वयात परकर पोलकं किंवा फ्रॉक ती घालत असते. तिला समज आली की तिला साडी नेसायला दिली जाते. त्यावेळेपासून साडी हेच स्त्रीचं भावविश्व बनतं. 

या साडीच्या सोबतीनेच ती तारुण्यात पदार्पण करते. स्वतःला साडीत लपेटून घेते. इथे साडी ही प्रतिमा देऊन बाईच्या दुखऱ्या जखमेची बाजू कवयित्रीने मांडली आहे. कविता बरंच काही सांगून जाते. उंबऱ्याच्या आतील आणि बाहेरचंसुद्धा.